पूर्वीपासून धुपेमळ भागाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ हेच नाव होते !  दिलखुश शेट, हिंदवी स्वराज्य संघटना

‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ या नावाचा फलक हटवण्यासाठी श्रीस्थळ पंचायतीने पाठवलेल्या नोटिसीला हिंदवी स्वराज्य संघटनेने दिले उत्तर !

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

काणकोण, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – श्रीस्थळ पंचायत अस्तित्वात येण्यापूर्वी धुपेमळ या भागाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ हे नाव होते आणि त्या आशयाचा लाकडी फलकही त्या ठिकाणी लावण्यात आला होता; मात्र कालांतराने हा लाकडी फलक खराब झाला. ‘हिंदवी स्वराज्य संघटने’ने विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर तेथे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’, असा नवीन फलक लावला, असे स्पष्टीकरण ‘हिंदवी स्वराज्य संघटने’चे अध्यक्ष दिलखुश शेट यांनी दिले आहे. श्रीस्थळ पंचायतीने धुपेमळ भागात ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ असा नामफलक लावण्यास आक्षेप घेऊन हा फलक २ दिवसांत हटवण्याची नोटीस ‘हिंदवी स्वराज्य संघटने’ला दिली होती. या नोटिसीला उत्तर देणारे निवेदन संघटनेने श्रीस्थळ पंचायतीला दिले. या निवेदनात हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना संघटनेचे अध्यक्ष दिलखुश शेट म्हणाले, ‘‘श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात विविध ठिकाणी वेगवेगळे फलक लावण्यात आले आहेत आणि हे सर्व फलक वैध आहेत का ? हे फलक लावतांना ग्रामसभेच चर्चा करण्यात आली होती का ? ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ हा फलक लावल्यावरच पंचायतीला जाग कशी आली ? संघटनेने फलक लावण्याविषयी प्रथम १३ ऑगस्ट या दिवशी पहिले आणि काही कालावधीने दुसरे पत्र पंचायतीला दिले होते. पत्र देऊन ६० दिवस उलटूनही पंचायतीने पत्रांना कोणताच प्रतिसाद दिलेला नसल्याने संघटनेने ‘धर्मवीर छत्रपती संभाजी नगर’ हा नामफलक लावला. याविषयी पंचायतीचे सरपंच पांडुरंग गावकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘मी सरपंचपदाचे त्यागपत्र दिलेले आहे आणि पंचायत सचिवांचेही स्थानांतर झालेले आहे, तरीही संघटनेने दिलेल्या निवेदनावर पंचायत मंडळ चर्चा करणार आहे.’’