२५.६.२०२१ या दिवशी सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांनी देहत्याग केला. ते पुष्कळ नामांकित वैद्य होते. आयुर्वेदिक औषधे बनवण्यात ते निष्णात होते. त्याच समवेत ते सातत्याने ईश्वराच्या अनुसंधानातही असायचे. त्यांच्या सहवासात आलेल्या साधकांनी केलेले त्यांचे गुणवर्णन आणि त्यांना पू. भावेकाकांविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. शांत आणि सौम्य आवाजात बोलणे
‘पू. भावेकाका यांचे वागणे आणि बोलणे साधे; परंतु सुस्पष्ट असायचे. त्यांच्या उक्तीला कृतीची जोड असायची. सर्वच साधकांप्रती त्यांचे वागणे प्रेमपूर्वक असायचे. ‘शांतपणे आणि सौम्य आवाजात बोलणे’, हे त्यांचे एक वैशिष्ट्य होते.
२. उत्तम स्वयंपाक करणे
२ अ. पू. भावेकाकांच्या मार्गदर्शनाखाली केलेली भाजी सर्वांनाच फार आवडणे : ‘स्वयंपाक कसा करावा ? त्यातही तो मोठ्या प्रमाणात करायचा असेल, तर तो कसा करावा ?’, याची त्यांना उत्तम जाण होती. त्यांनी अनेकदा आश्रमाच्या स्वयंपाकघरात थांबून तेथे स्वयंपाक करणार्यांना मार्गदर्शन करत विविध भाज्या करवून घेतल्या आहेत. ‘त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला पदार्थ कुणाला आवडला नाही’, असे कधी झाले नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली अळूची पातळ भाजी सर्वांनाच फार आवडत असे.
२ आ. ‘साधकांनी भाजी खावी’, यासाठी ती रुचकर करवून घेतांना त्या भाजीचे चांगले गुणही सांगणे : पू. भावेकाकांना ‘आयुर्वेदानुसार आहार कसा असावा ?’, याची उत्तम जाण असल्याने त्याविषयीचे अपसमजही ते दूर करायचे. एकदा ‘आश्रमातील बरेच साधक वांग्याची भाजी खायला अप्रसन्न असतात’, असे त्यांच्या लक्षात आले. बाजारात वांगी विपुल प्रमाणात आणि ती कधीही मिळणारी भाजी आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात सेवा करणार्यांना वाटायचे, ‘बरेच साधक वांग्याची भाजी नको म्हणतात, तर काय करायचे ?’ त्या वेळी पू. भावेकाकांनी स्वयंपाकघरात थांबून ही सेवा करणार्या साधकांकडून वांग्याची भाजी करवून घेतली. त्या दिवशी ती भाजी सर्वांनाच फार आवडली. त्या समवेत पू. काकांनी ‘वांग्यातील चांगले गुण कोणते ?’, हेही साधकांना सांगितले.
३. ‘वैद्यकशाखांच्या संदर्भात दुराग्रही असणे अयोग्य असून त्या क्षणी रुग्ण महत्त्वाचा आहे’, असे पू. भावेकाकांनी सांगणे
३ अ. पू. भावेकाकांनी त्यांना होणारा हृदयविकाराचा त्रास न्यून करण्यासाठी शस्त्रकर्म करून घेणे, याला काही वैद्यांनी विरोध केल्यावर त्यांना वैद्यकशाखेपेक्षा ‘रुग्ण वाचणे’ महत्त्वाचे असल्याचे लक्षात आणून देणे : त्यांना हृदयविकार आणि मधुमेह होता. ते आयुर्वेदानुसार त्यावर उपचार घेत होते. पुढे त्यांचा हृदयविकार वाढला आणि त्यांना शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी मला (डॉ. दुर्गेश सामंत यांना) सांगितले, ‘‘मी शस्त्रकर्म करून घेणार आहे’, हे समजल्यावर काही वैद्यांकडून मला विरोध करणारे दूरभाष आले. त्यांचे म्हणणे होते, ‘‘तुम्हीच असे कसे करता ?’’ तेव्हा मी (पू. भावेकाका यांनी) त्यांना सांगितले, ‘‘आयुर्वेदानुसार उपाय करून झालेत; परंतु ते अपुरे पडत असतील, तर दुसरा उपाय करायला काय अडचण आहे ? रक्तवाहिनी उघडत नाही, तर त्यासाठी अन्य मार्गाने उपचार करणे’, यात चूक काय आहे ? शेवटी रुग्ण महत्त्वाचा आहे.’’
३ आ. आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार काही रुग्ण घेत असलेल्या औषधांमुळे कर्करोग होत असल्याचे सांगणार्या वैद्यांना रुग्णांमध्ये अपसमज पसरवणे अयोग्य असल्याची जाणीव करून देणे : पू. भावेकाकांची आधुनिक वैद्यकशास्त्र आणि आयुर्वेद यांविषयी भूमिका स्पष्ट होती. ते म्हणत, ‘वैद्यकशाखांच्या संदर्भात आग्रही दुजाभाव आणि हट्ट बरा नव्हे.’ एकदा एक वैद्य आश्रमात आले होते. त्यांनी काही रुग्णांना पडताळले. आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार काही रुग्णांना काही औषधे चालू होती. त्या वैद्यांनी त्या रुग्णांना सांगितले, ‘‘ही औषधे योग्य नाहीत. त्यांच्यामुळे कर्करोग होतो.’’
पू. भावेकाकांना हे समजल्यावर त्यांनी त्या वैद्यांना सांगितले, ‘‘त्या औषधांनी कर्करोग होत नाही. उगाच रुग्णांना असे काही सांगून घाबरवून सोडणे योग्य नव्हे. कृपया तसे करू नये.’’ (३०.६.२०२१)
आधुनिक वैद्य (डॉ.) भिकाजी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. शांत आणि सहजभावात रहाणारे पू. भावेकाका !
‘पू. भावेकाका संत असूनही आश्रमात येता-जाता साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांची विचारपूस करायचे. ते चिकित्सालयात सेवा करणार्या सर्वांशी सहजतेने बोलायचे. त्यामुळे आम्हाला ‘ते आमच्याच कुटुंबातील सदस्य आहेत’, असे वाटायचे. आम्हाला त्यांचा आधार वाटायचा. मी कधीही त्यांना रागाने बोलतांना किंवा त्यांची कधी चिडचिड होतांना पाहिली नाही. आजही पू. काकांची बोलण्याची पद्धत, त्यांची सहजता, प्रेमभाव आणि नम्रता आठवून कृतज्ञतेने मन भरून येते.
२. अनौपचारिक बोलत असतांना वेगवेगळ्या संतांच्या जीवनातील एखादा प्रसंग सांगून साधकाच्या मनात ‘भाव’ निर्माण करणे
सेवा संपल्यानंतर रात्री ९ वाजता मी आणि पू. भावेकाका अनौपचारिक बोलायचो. तेव्हाही ते मायेतील न बोलता प्रतिदिन मला वेगवेगळ्या संतांच्या जीवनातील एखादा प्रसंग सांगून ‘माझ्यात भाव कसा निर्माण होईल ?’, हे पहात होते. पू. काकांनी सांगितलेल्या संतांच्या गोष्टी मी पूर्वी कधी ऐकल्या नव्हत्या किंवा माझ्या वाचनातही आल्या नव्हत्या. अशा प्रकारे प्रतिदिन आमचा ‘भावसत्संग’ व्हायचा. मी त्या भावरसात डुंबून जात असे. तेव्हा ‘रात्रीचे १० कधी वाजायचे ?’, हे आम्हाला कळायचेही नाही.’ (३०.६.२०२१)
आधुनिक वैद्य (डॉ.) उज्ज्वल कापडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. नेहमी आनंदी असणे
अ. ‘पू. भावेकाका नेहमी आनंदी असायचे. त्यांना मी कुठल्याही परिस्थितीत अस्थिर झाल्याचे कधी पाहिले नाही.
आ. पू. काकांना मधुमेह असल्याने त्यांना वेळेवर जेवावे लागायचे. रुग्ण साधकांना तपासतांना अनेक वेळा पू. काकांना जेवायला उशीर व्हायचा; पण ते नेहमी आनंदी असायचे.
२. प्रेमळ स्वभाव
अ. ते आश्रमातील सर्व साधकांवर पुष्कळ प्रेम करायचे. चिकित्सालयात सेवा करणार्या एखाद्या साधकाचा वाढदिवस असेल, तर पू. काका त्या साधकाच्या आवडीचा खाऊ चिकित्सालयातील सर्वांसाठीच आणायचे.
आ. चिकित्सालयात आलेल्या रुग्ण साधकाचा वाढदिवस असेल, तर पू. काका त्या साधकाला स्वतःजवळील खाऊ द्यायचे.
इ. पू. काका चिकित्सालयात येणार्या प्रत्येक रुग्ण साधकाला प्रेमाने तपासायचे. त्या वेळी ते रुग्ण साधकाचे आई-वडील आणि इतर कुटुंबीय यांचीही विचारपूस करायचे.
ई. एखादा रुग्ण साधक चिकित्सालयाची वेळ संपल्यावर आला, तरी पू. काका काही प्रतिक्रिया व्यक्त न करता त्याला तेवढ्याच प्रेमाने आणि शांतपणे तपासायचे.
३. पू. काका स्वतः सतत नामजप करायचे आणि रुग्ण साधकांनाही औषधांच्या समवेत नामजप करायला सांगायचे.
४. साधकाला आध्यात्मिक त्रास होत असतांना त्रास न्यून होईपर्यंत त्याला स्वतःशेजारी बसवून नामस्मरण करवून घेणे
‘मला आध्यात्मिक त्रास होत आहे’, हे पू. काका ओळखायचे आणि ते मला त्यांच्या बाजूला बसवून नामजप करायला सांगायचे. मी त्यांना ‘माझा नामजप होत नाही’, असे सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘नामजप होत नसेल, तरी माझ्या बाजूला बसून रहा. जेवढा जमतो, तेवढा नामजप करण्याचा प्रयत्न कर.’’ असे सांगून माझा त्रास न्यून होईपर्यंत ते मला तिथेच त्यांच्या बाजूला बसवून ठेवायचे.’ (१.७.२०२१)
कु. स्मित कांबळे, फोंडा, गोवा. (वय १७ वर्षे)
१. नम्रता
‘पू. भावेकाकांमध्ये अहं अत्यल्प होता. त्यांनी साधकांवर उपचार केल्यानंतर रुग्ण त्यांना सांगायचे, ‘‘पू. काका, आपल्या औषधांमुळे पुष्कळ पालट झाला. आता बरे वाटत आहे.’’ तेव्हा पू. काका त्यांना म्हणायचे, ‘‘ईश्वररूपी प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेनेच तुम्हाला बरे वाटले. मी केवळ माध्यम होतो.’’
२. पू. भावेकाकांमुळे आध्यात्मिक लाभ होणे
अ. पू. काकांनी लिहिलेला ‘केसपेपर’ हातात घेतल्यावरही मला पुष्कळ आध्यात्मिक लाभ होत असत. ‘पू. काकांनी साधकांना लिहून दिलेली औषधे काढतांना आध्यात्मिक लाभ होऊन माझ्या शरिरावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला वाटायचे.
आ. पू. काकांच्या केवळ अस्तित्वामुळे सेवा करतांना अनेकदा माझा नामजप आपोआप चालू व्हायचा. (१.७.२०२१)
कु. दीपश्री प्रकाश जोशी, सनातन आश्रम, रामनाथी फोंडा, गोवा.
१. पू. भावेकाकांनी औषधी वनस्पतीच्या वैशिष्ट्यातून नम्रतेचे महत्त्व सांगणे
‘लागवड सेवेच्या निमित्ताने माझा पू. भावेकाकांशी संपर्क आला. तेव्हा झाडांचा अभ्यास करण्याची पद्धत, त्यांची साठवणूक आणि औषधीकरण यांसंदर्भात पू. काका अतिशय सोप्या, संक्षिप्त आणि सहज पद्धतीने सांगत असत. एकदा वनस्पतींचा अभ्यास करतांना त्यांनी मला सांगितले, ‘‘नागरमोथा ही नदीकिनारी वाढणारी वनस्पती आहे. या वनस्पतीप्रमाणे आपण नम्र असायला हवे. कितीही पूर आला, तरी ही वनस्पती मोडणार नाही किंवा वाहूनही जाणार नाही. इतर वनस्पती मोडतील किंवा वाहून जातील; पण ही झुकते. त्यामुळे ती कठीण परिस्थितीतही टिकून रहाते.’’ त्यांच्या सांगण्यातून साधनेसाठी बोध मिळत असे.
२. गोष्ट सांगून साधनेला दिशा देणे
२ अ. गुरु-शिष्यांची गोष्ट सांगून मनावर अनुसंधानाचे महत्त्व अंकित करणे : काही मासांपूर्वी मला २ दिवस त्यांना महाप्रसाद देण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांनी मला एका शिष्याची गोष्ट सांगितली. ‘एक शिष्य त्याच्या गुरूंच्या समवेत रहायचा. तो गुरूंची मनोभावे सेवा करायचा. एकदा गुरूंना त्या शिष्याची परीक्षा घ्यायची होती; म्हणून ते शिष्याला काहीतरी कारण सांगून दुसरीकडे रहायला गेले. शिष्याला श्री गुरूंविना रहावत नव्हते. शिष्य प्रतिदिन पहाटे उठून श्री गुरूंचे स्मरण आणि पूजन करायचा. अनेक वर्षे असे मनोभावे स्मरण केल्यावर गुरूंनाही त्या शिष्याविना रहावेना. शेवटी त्याचे गुरु पहाटेच दारासमोर उभे राहिले आणि शिष्याला म्हणाले, ‘‘तू इतकी वर्षे माझे असे स्मरण केलेस की, मला तुझा विरह सहन झाला नाही.’’
२ आ. गुरु-शिष्यांचा प्रसंग ऐकतांना तो प्रसंगच डोळ्यांसमोर उभा रहाणे आणि ‘ते गुरु, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवलेच आहेत’, असे वाटणे : पू. काका हे सांगत असतांना ते जणू ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्णन करत आहेत’, असे वाटून माझ्या डोळ्यांसमोर तो पूर्ण प्रसंग उभा राहिला. मी पू. काकांना त्याविषयी काहीही न सांगताही पू. काकांना ते सर्व समजले आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘तूही असेच गुरूंचे स्मरण कर.’’
३. पू. भावेकाकांच्या बोलण्यातून साधनेला प्रेरणा मिळणे
पू. भावेकाका मला नेहमी म्हणायचे, ‘‘तुझा स्वभाव फार प्रेमळ आहे. तो टिकवून ठेव आणि या प्रेमानेच देवाला बांधून ठेव.’’ तेव्हा ‘पूज्य काकांनी सर्व साधकांना हा आशीर्वाद दिला आहे’, असे मला वाटले. ‘श्रीमद्भगवद्गीते’तील अनेक प्रसंग सांगून ते मला साधनेसाठी प्रेरणाही द्यायचे. मला पू. काकांशी कुठल्याही विषयावर मोकळेपणाने बोलता यायचे. ते मला माझे गुण आणि स्वभावदोषही सांगायचे.
४. ‘पू. काकांना आयुर्वेदातील इतके ज्ञान होते की, त्यांच्या रूपात साक्षात् श्री धन्वन्तरीदेवताच सर्व सांगते’, असे मला वाटायचे. ते ज्ञान पू. काका सहजतेने सांगायचे.
‘देवाच्या कृपेने मला एवढ्या मोठ्या संतांची सेवा आणि त्यांचा सहवास लाभला’, यासाठी मी पुष्कळ कृतज्ञ आहे. ‘त्यांनी आतापर्यंत केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ सर्व साधकांना यापुढेही होवो’, ही देवाच्या चरणी प्रार्थना.’ (१.७.२०२१)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |