५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जामसंडे येथील चि. कृष्णाली आकाश माने (वय १ वर्ष) !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली जामसंडे (ता. देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. कृष्णाली आकाश माने (वय १ वर्ष) !

आश्विन कृष्ण पक्ष सप्तमी (२८.१०.२०२१) या दिवशी जामसंडे, देवगड येथील चि. कृष्णाली आकाश माने हिचा प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला तिच्या जन्मापूर्वी आलेल्या अनुभूती आणि तिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

चि. कृष्णाली माने

चि. कृष्णाली आकाश माने हिला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

१. गर्भारपण

१ अ. गर्भारपणी साधना आणि सेवा करणे : ‘विवाहानंतर मी सनातन संस्थेच्या माध्यमातून अष्टांग साधना करू लागले. मी, सासूबाई (सौ. आरती माने) आणि सासरे (श्री. राजन मायाजी माने) आम्ही कुडाळ सेवाकेंद्राजवळ राहू लागलो. आम्हा तिघांना कुडाळ सेवाकेंद्रात सेवेला जाता येत होते. मला सद्गुरु सत्यवान कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. सेवाकेंद्रात सेवा करतांना माझी भावजागृती होत असे आणि माझा नामजप सतत चालू असायचा.

१ आ. अनुभूती

१ आ १. तीन आंबोळ्यांवर ॐ उमटणे आणि ‘श्रीकृष्णाने काहीतरी संकेत दिला असावा’, असे वाटणे : मला दिवस गेल्याचे समजल्यावर मी श्रीकृष्णाला कृतज्ञतापूर्वक नमस्कार केला आणि मी नामजप करत आंबोळ्या करायला घेतल्या. तेव्हा मला आंबोळीवर ॐ उमटलेला दिसला. मला प्रथम वाटले, ‘असेच झाले असेल’; पण एका पाठोपाठ ३ आंबोळ्यांवर ॐ उमटला. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘श्रीकृष्णाने काहीतरी संकेत दिला असावा’, असे मला वाटले.

१ आ २. नामजप करतांना आणि श्रीरामरक्षास्तोत्र अन् देवीकवच म्हणतांना बाळाची हालचाल अधिक प्रमाणात जाणवणे : गर्भारपणाच्या सहाव्या मासात मी नामजप करत असतांना आणि श्रीरामरक्षास्तोत्र अन् देवीकवच म्हणतांना बाळाची हालचाल अधिक असायची आणि अन्य वेळी हालचाल अल्प असायची.

१ आ ३. ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गेले असतांना आरती चालू झाल्यावर प्रार्थना केल्यावर देवीच्या उजव्या हातातील फूल पडणे आणि पुजार्‍याने ते फूल साधिकेला देऊन ‘देवीने तुम्हाला कौल दिला आहे’, असे सांगणे : मी सातव्या मासात माझ्या माहेरी नेसरी, गडहिंग्लज (कोल्हापूर) येथे गेले होते. तेथे मी ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गेले असतांना आरती चालू झाल्यावर ‘माझे बाळंतपण सुखरूप होऊ दे. बाळाचे आरोग्य चांगले असू दे. तुझ्या नामाचे संरक्षककवच माझ्याभोवती निर्माण होऊ दे’, अशा प्रार्थना केल्या. आरती चालू असतांना देवीच्या उजव्या हातातील फूल पडले. तेव्हा पुजार्‍याने ते फूल मला देऊन सांगितले, ‘‘तुम्ही देवीला जे सांगितले आहे, ते देवी पूर्ण करील. देवीने तुम्हाला काहीतरी कौल दिला आहे.’’ त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

१ आ ४. गरोदरपणात नेहमी साधनेत आणि सात्त्विक वातावरणात असल्यामुळे मला कोणताही त्रास झाला नाही.

श्री. आकाश माने

२. प्रसुती

२ अ. आधुनिक वैद्यांनी सांगितलेल्या नियोजित दिवसाच्या आधी त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात भरती होणे, पुष्कळ त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि नंतर प्रसुती सुलभरित्या होणे : आधुनिक वैद्यांनी माझ्या प्रसुतीसाठी २६.१०.२०२० हा दिवस सांगितला होता; पण ८.१०.२०२० या दिवशी मला त्रास होऊ लागला; म्हणून मला रुग्णालयात नेण्यात आले. मला पुष्कळ त्रास होत होता; म्हणून मी श्रीरामरक्षास्तोत्र म्हणणे आणि सतत नामजप करणे चालू ठेवले. मी मनोमन ‘परम पूज्य, तुम्हीच आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून माझे बाळंतपण सुखरूपपणे करा’, अशी प्रार्थना केली. काही वेळाने माझी प्रसुती सुलभरित्या झाली. तेव्हा माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

३. जन्मानंतर

३ अ. जन्म ते ५ मास

३ अ १. बालिकेचा तोंडवळा तेजस्वी दिसणे : बालिकेचा जन्म झाल्यावर तोंडवळा पुष्कळ तेजस्वी दिसत होता. मला बालिकेकडून चैतन्य मिळत होते आणि मला तिच्याकडे पाहून आनंद जाणवत होता.

३ अ २. जन्मतःच बालिकेच्या बोटांची मुद्रा होती आणि नंतरही तिच्या बोटांची मुद्रा केलेली असायची.

३ अ ३. सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष विशारद) यांच्या सांगण्यानुसार बाळाचे ‘कृष्णाली’ असे नामकरण करणे : गोवा येथील रामनाथी आश्रमातील सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष विशारद) यांना आम्ही बालिकेची माहिती पाठवली आणि त्यांच्या सांगण्यावरून बालिकेचे नाव ‘कृष्णाली’ असे ठेवण्यात आले. त्या कालावधीत बालिकेचे निरीक्षण करतांना मला जाणवले, ‘श्रीकृष्ण बासरी वाजवतांना जशी त्याच्या पायाची स्थिती असायची, तशी कृष्णालीच्या पायाची स्थिती असायची.’

३ अ ४. नामजपाची ओढ : सद्गुरु सत्यवान कदम प्रतिदिन पहाटे ५ वाजता कोरोनाविरुद्ध आध्यात्मिक बळ वाढावे, यासाठी सांगितलेला दुर्गा-शिव-दत्त हा नामजप ‘ऑनलाईन’ घ्यायचे. त्या वेळेत कृष्णाली झोपेतून जागी व्हायची.

३ अ ५. कृष्णाली ५ मासांची असतांना एकदा तिच्या समोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवले होते. तेव्हा तिने दैनिक ‘सनातन प्रभात’ ओढून स्वतःच्या कुशीत घेतले आणि त्याला नमस्कार केला.

३ अ ६. सहनशील : तिला ‘पोलिओ’चा डोस किंवा अन्य लस देतांना ती जराही रडायची नाही आणि त्यानंतरही दिवसभर ती शांत असायची. ‘ती नामजपच करत आहे’, असे मला जाणवायचे. एकदा मी रुग्णाईत असतांना मला रुग्णालयात भरती करावे लागले. तेव्हा कृष्णाली ५ घंटे दूध न पिता आणि कुणालाही त्रास न देता शांतपणे घरी राहिली.’ – सौ. श्रुती आकाश माने (चि. कृष्णालीची आई)

३ अ ७. नामजप करण्याची आवड : ‘एकदा मी कृष्णालीला देवगड येथील सौ. मीनाक्षी इचलकरंजीकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्याकडे नेले होते. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘ती (कृष्णाली) हनुमंताचा नामजप करते’, असे मला जाणवले.’’

३ अ ८. देवाची ओढ : एकदा कृष्णालीच्या एका बाजूला हनुमंताचे चित्र आणि दुसर्‍या बाजूला खेळणे ठेवले होते. तेव्हा ती हनुमंताच्या चित्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. त्या वेळी तिला रांगता येत नव्हते, तरीही ती जोर लावून हनुमंताच्या चित्राजवळ गेली आणि तिने डोके टेकवून नमस्कार केला.’ – श्री. आकाश माने (चि. कृष्णालीचे वडील)

सौ. श्रुती माने

३ आ. ६ मास ते १ वर्ष

३ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्याप्रती ओढ

अ. आम्ही भाववृद्धी सत्संग ऐकतांना भ्रमणभाषच्या पडद्यावर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आणि श्रीकृष्णाचे चित्र आल्यावर ती नमस्कार करून टाळ्या वाजवायची.’ – सौ. श्रुती आकाश माने

आ. ‘मी कृष्णालीला मांडीवर घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राशी आणि श्रीकृष्णाच्या चित्राशी बोलत असतांना ती शांतपणे ऐकते.

इ. कृष्णाली रडत असतांना तिच्या समोर कितीही खेळणी ठेवली किंवा काहीही केले, तरी ती शांत होत नाही; मात्र त्या वेळी तिला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दाखवल्यावर ती लगेच शांत होते.

ई. तिची अंघोळ झाल्यावर तिला परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार करायला सांगितल्यावर ती लगेच नमस्कार करते आणि त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते.’ – सौ. आरती राजन माने (कृष्णालीची आजी (वडिलांची आई)), जामसंडे, देवगड, सिंधुदुर्ग (७.९.२०२१)

४. स्वभावदोष

‘हट्टीपणा’ – सौ. श्रुती आकाश माने , जामसंडे, देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. (७.९.२०२१)

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक ७.९.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक