राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

काँग्रेस सरकारने हिंदूंना लक्ष्य करून मुसलमानांना खुश करण्यासाठीच हा आदेश दिला आहे, हे उघड आहे. धर्मनिरपेक्ष भारतात प्रशासकीय कार्यालयांच्या जागेत अनधिकृत दर्गे आहेत किंवा काही ठिकाणी नमाजपठणासाठी जागाही उपलब्ध करून दिली आहे. त्याला कधी काँग्रेस किंवा निधर्मीवादी विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

जयपूर (राजस्थान) – राजस्थान राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. यावर भाजपने टीका केली आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हिंदूंचे धार्मिक स्थान निर्माण करण्यात आले आहे आणि तेथे पूजा अन् आरती केली जाते. या आदेशानंतर वाद झाल्याने पोलीस मुख्यालयातून एक स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पोलीस ठाणे आणि कार्यालये येथे जर पूर्वीपासून धार्मिक स्थळे असतील, तर त्याला आताचा आदेश लागू होणार नाही. नव्याने बनवण्यात येणारी पोलीस ठाणी आणि कार्यालये यांना हा आदेश लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजस्थान पोलिसांच्या गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त महासंचालक ए. पोन्नूचामी यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी हा आदेश जारी केला आहे. यात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस विभागातील विविध कार्यालये आणि परिसर येथे श्रद्धेच्या नावाखाली धार्मिक स्थळ निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे जी कायद्यानुसार योग्य नाही. ‘राजस्थान धार्मिक भवन आणि धर्मस्थळ अधिनियम १९५४’नुसार सार्वजनिक स्थानांवर धार्मिक स्थळ बांधणे अवैध आहे. पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारतीच्या मानचित्रामध्ये कुठेही धार्मिक स्थळ निर्माण करण्याची तरतूद नाही.

काँग्रेस सरकारने तुघलकी आदेश मागे घ्यावा ! – भाजप

भाजपचे खासदार डॉ. किरोडी लाल मीणा यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून या आदेशाविषयी म्हटले की, हा आदेश देऊन राज्यातील काँग्रेस सरकारने थेट हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर आक्रमण केले आहे. हा हिंदु धर्म आणि संस्कृती यांचा अवमान आहे. हे कृत्य काँग्रेसच्या लांगूलचालनाची वृत्ती दर्शवतो. हा आदेश जारी करणे एका पोलिसाचे धाडस असू शकत नाही. असा आदेश केवळ सरकारच देऊ शकते. हा तुघलकी आदेश परत घेण्याची आम्ही मागणी करत आहोत. हिंदूंच्या श्रद्धांवर होणारे आक्रमण आम्ही सहन करू शकत नाही, अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.