भारत आणि पाक यांच्या क्रिकेट सामन्यात भारताचा विजय झाल्यास सूड म्हणून पाकमध्ये हिंदूंच्या मुलींचे अपहरण केले जाते ! – पाकमधील निर्वासित हिंदूंची माहिती

पाकमधील हिंदूंची ही स्थिती भारतातीलच नव्हे, तर जगभरातील हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

नवी देहली – भारत आणि पाक यांच्यातील टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात पाकने भारताचा पराभव केल्यानंतर पाकमध्ये उत्सव साजरा करण्यासह भारतातही मुसलमानबहुल भागात फटाके फोडण्यात आले. याविषयी देहलीतील आदर्शनगर येथे वास्तव्य करणार्‍या पाकिस्तानी निर्वासित हिंदूंनी सांगितले की, पूर्वी भारत-पाक सामन्याच्या वेळी भारताचा विजय झाल्यावर याचा सूड घेण्यासाठी धर्मांधांकडून हिंदूंच्या मुलींचे अपहरण करण्यात येत असे. याविषयी अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिला; कारण त्यांचे नातेवाईक अद्यापही पाकिस्तानमध्ये असून त्यांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

एका शरणार्थी महिलेने सांगितले, ‘४-५ वर्षांपूर्वी भारत एक सामना जिंकला होता, तेव्हा सूड म्हणून ३ गुजराती भाषिक हिंदु मुलींचे अपहरण करण्यात आले होते. त्यांची स्थिती वाईट करण्यात आली होती. अशा घटनांत कधी कधी मुली परत येत असत, तर कधी त्यांचा ठावठिकाणाही लागत नसे.’ ही महिला कॅमेर्‍यासमोर माहिती देण्यास घाबरत होती. तिने म्हटले की, माझे नातेवाईक पाकमध्ये आहेत. जर मी समोर येऊन सांगू लागले, तर माझ्या नातेवाइकांना ठार केले जाईल.