‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका ६९ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या सौ. योया सिरियाक वाले यांची विविध गुणवैशिष्ट्ये !

‘आश्रमात होणारे यज्ञयागादी धार्मिक विधी, विविध कार्यक्रम, सोहळे आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’वतीने आयोजित केलेले प्रयोग यांच्या वेळी माझा ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधिका सौ. योया वाले यांच्याशी संपर्क येतो. विविध प्रसंगी त्यांच्या सहवासात असतांना मला त्यांच्यातील अनेक गुण लक्षात आले. त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.   

सौ. योया वाले

१. विनम्रता

योयाताईंना सूक्ष्मातील पुष्कळ कळते; परंतु त्यांच्या मनात ‘मला काहीच कळत नाही’, असे विचार असतात. त्या विदेशातून भारतात साधना करण्यासाठी आलेल्या आहेत, तरी त्यांना त्याचा अहं वाटत नाही. त्या सर्वांशी नम्रपणे बोलतात आणि वागतात. खरेतर त्यांना सूक्ष्मातून पुष्कळ कळते; परंतु तरीही त्या ‘स्वतःला जाणवलेली सूत्रे योग्य आहेत कि नाही ?’, याविषयी पुढे विचारून घेतात.

२. हिंदु संस्कृतीनुसार आचरण करणे

त्या साधना करण्यासाठी विदेशातून भारतात आलेल्या आहेत. त्यांनी हिंदु संस्कृती आणि धर्माचरण यांचे महत्त्व अन् त्यांचे पालन केल्यामुळे होणारे विविध लाभ यांचे सखोल चिंतन केले आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर हिंदु संस्कृती आणि धर्माचरण यांचे महत्त्व बिंबले आहे. त्यांना हिंदु संस्कृती आणि हिंदु धर्म पुष्कळ आवडतो. त्या प्रतिदिन सात्त्विक पद्धतीने शिवलेला पंजाबी पोशाख परिधान करतात आणि केसांचा अंबाडा किंवा वेणी घालतात. त्या प्रतिदिन कपाळाला कुंकूही लावतात. त्या सणाच्या दिवशी सहावारी साडी नेसून सात्त्विक अलंकार घालतात. त्यांना पुरणपोळी, मोदक, करंजी, लाडू, भजी इत्यादी भारतीय पदार्थ पुष्कळ आवडतात.

३. मनातील शंका आणि प्रश्न प्रांजळपणे विचारून घेणे

त्यांच्यामध्ये इतरांना विचारून घेण्याची वृत्ती असल्यामुळे त्या जिज्ञासू वृत्तीने मनातील शंका इतरांना विचारून घेतात. त्यांना वाईट शक्तींचा त्रास होत असेल, तर त्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, पू. (सौ.) भावना शिंदे किंवा त्यांचे यजमान सद्गुरु सिरियाक वाले यांना नामजपादी उपाय विचारून घेतात. त्याचप्रमाणे त्यांना साधनेत येणार्‍या अडचणींविषयी त्या सहसाधक, उत्तरदायी साधक किंवा संत यांना मनमोकळेपणाने सांगून त्यांचे मार्गदर्शन घेतात.

४. वाईट शक्तींच्या त्रासाविषयी सतर्क असणे

त्या स्वतःला होणारे, तसेच समष्टीला होणारे त्रास यांविषयी पुष्कळ सतर्क असतात. त्यामुळे त्या स्वतःला किंवा इतरांना होणार्‍या त्रासांवर तत्परतेने नामजपादी उपाय विचारून घेतात. त्यामुळे त्रासाची तीव्रता वाढण्यापूर्वीच देव त्यांना उपाय सुचवून त्रासाचे निवारण करतो. त्यांच्या सतर्कतेमुळे ‘वाईट शक्ती कशा प्रकारे त्रास देतात आणि तो दूर करण्यासाठी कोणता उपाय लागू होतो ?’, याचा अभ्यास आम्हाला करता येतो.

कु. मधुरा भोसले

५. प्रेमभाव

सौ. योयाताईंच्या मनात साधकांविषयी पुष्कळ प्रेमभाव आहे. ‘सर्व साधक एका कुटुंबातील सदस्य आहेत’, असे वाटून त्यांना प्रत्येकाविषयी जिव्हाळा वाटतो. त्यामुळे साधक योयाताईंना भेटतात, तेव्हा त्यांना पुष्कळ आनंद होतो आणि त्या सर्वांची प्रेमाने चौकशी करतात. एखादा साधक बरेच दिवस भेटला नाही, तर त्या संबंधित साधकाच्या संदर्भात अन्य साधकांकडे विचारपूस करतात. त्यांना बालसाधकांविषयी आपुलकी आणि बालसंतांविषयी आदरयुक्त प्रेम जाणवते.

६. परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ असणे

एखाद्या धार्मिक विधीचे सूक्ष्म परीक्षण करत असतांना विधीच्या जाणकार व्यक्तींकडून किंवा पुरोहितांकडून त्या ‘संबंधित विधीचा उद्देश, महत्त्व आणि त्याच्याशी निगडित असणारी देवता कोणत्या आहेत ?’, याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेतात. त्या सूक्ष्म चित्रे काढतात, तेव्हा त्यांची सत्यता वाढण्यासाठी ‘चित्रात कोणती सूत्रे अंतर्भूत करायला हवीत आणि सूक्ष्म चित्र अधिकाधिक परिपूर्ण कसे करायला हवे ?’, याविषयी तळमळीने आणि अभ्यासपूर्ण प्रयत्न करतात.

७. उत्तम निरीक्षणक्षमता

त्या एखाद्या धार्मिक विधीचे किंवा कार्यक्रमाचे निरीक्षण चांगल्या प्रकारे करून त्यातील त्रुटी लक्षात आणून देतात आणि धार्मिक विधी किंवा कार्यक्रम अधिक चांगला होण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचनाही सांगतात. त्यांची निरीक्षणक्षमता चांगली असल्यामुळे त्यांना स्वतःची साधना आणि समष्टी (इतर साधक किंवा आश्रम) यांतील बारीक-सारीक चुकाही लगेच लक्षात येतात.

८. अभ्यासू वृत्ती आणि स्वतःला पालटण्याची तळमळ

सौ. योयाताई स्वतःचे वागणे आणि बोलणे यांचे निरीक्षण करून त्यातील चुका किंवा त्रुटी शोधतात आणि काही प्रसंगांत त्या संबंधित साधकाची क्षमाही मागतात. त्यांच्यामध्ये स्वतःला पालटण्याची पुष्कळ तळमळ असल्याचे जाणवते. त्या त्यांच्या कृती किंवा विचार यांच्या स्तरावर झालेल्या चुका मनमोकळेपणाने आम्हाला सांगतात आणि त्या स्वतःमध्ये सकारात्मक पालट करण्यासाठी प्रयत्नरत असतात.

९. तत्त्वनिष्ठ असणे

योयाताईंमध्ये पुष्कळ तत्त्वनिष्ठता जाणवते. त्या सूक्ष्म स्तरावर लक्षात आलेली सूत्रे भावनिक स्तरावर न सांगता तत्त्वनिष्ठ राहून सांगतात. आश्रमात त्यांची मुलगी कु. अनास्तासियाही रहाते. त्यांच्या मनात तिच्याविषयी पुष्कळ प्रेम आहे; परंतु अनास्तासियाचे काही चुकत असेल, तर त्या तत्त्वनिष्ठ राहून तिला तिच्या चुका सांगतात. यावरून योयाताई मानसिक स्तरावर न रहाता अधिकाधिक वेळ आध्यात्मिक स्तरावर रहात असल्याचे जाणवते.

१०. संत आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव असणे

१० अ. बालकसंत पू. वामन राजंदेकर यांना भेटतात, तेव्हा त्या त्यांना पाहून भावपूर्णरित्या नमस्कार करतात.

१० आ. सद्गुरु सिरियाक वाले : त्यांचे यजमान सद्गुरु सिरियाक वाले यांच्याविषयीही योयाताईंच्या मनात पुष्कळ आदरभाव असल्याचे जाणवते. त्या त्यांच्याकडे केवळ पती म्हणून न पहाता त्यांना ‘सद्गुरु’ म्हणून पहात असल्याचे जाणवते. त्या त्यांच्या यजमानांचा उल्लेख आदरभावाने करतात.

१० इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ : या दोन्ही सद्गुरूंविषयी योयाताईंच्या मनात पुष्कळ भक्तीभाव जाणवतो. त्यांना पहात असतांना ‘त्या जणू देवीचेच दर्शन घेत आहेत’, या भावाने सद्गुरुद्वयींना पहात असतात.

१० ई. परात्पर गुरु डॉ. आठवले : त्यांना परात्पर गुरुदेवांचे दर्शन होते, तेव्हा त्या निरागस बालकाप्रमाणे गुरुदेवांना न्याहाळत असतात.

११. वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही आनंदी असणे

योयाताईंना मोठ्या वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. त्यामुळे त्यांना ‘पुष्कळ थकवा येणे, मनातील नकारात्मक विचार वाढणे आणि काहीही न सुचणे’, यांसारखे त्रास होत असतात, तरीही त्या विविध आध्यात्मिक उपाय करून त्रासाशी लढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना पुष्कळ त्रास होत असला, तरी त्या आनंदी राहून सेवा करण्याचा प्रयत्न करतात.

१२. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी गांभीर्य असणे

एका धार्मिक विधीसाठी आम्ही नागेशी येथे गेलो होतो. तेव्हा योयाताईंनी एक लहानशी नोंदवही दोरीला बांधून ती गळ्यात घातली होती. या नोंदवहीत त्यांनी स्वयंसूचना लिहिल्या होत्या. धार्मिक विधीमध्ये वेळ मिळाल्यावर त्या लगेच नोंदवही पाहून स्वयंसूचनांचे सत्र करत होत्या. त्याचप्रमाणे त्यांना स्वतःच्या लक्षात आलेल्या चुकाही त्या एका वहीत लिहित होत्या. काही वेळा त्यांच्याकडून एखादी गंभीर चूक झाल्यास त्या कठोर प्रायश्चित्तही घेतात. यावरून ‘त्या वेळ न दवडता स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेविषयी किती गांभीर्याने प्रयत्न करतात’, हे लक्षात आले.

योयाताई अनेक गुणांचा समुच्चय आहेत. त्यांच्याविषयी जितके लिहावे, तितके अल्प आहे. अशा ‘बहुगुणी व्यक्तीमत्त्व असणार्‍या योयाताईंचा सहवास आम्हा साधकांना मिळाला’, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘मला योयाताईंकडून अधिकाधिक शिकता येऊ दे आणि त्यांचे गुण आत्मसात करता येऊ दे’, अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते.’

– कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.३.२०२१)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.