विनम्र, सतत शिकण्याच्या स्थितीत राहून अखंड भावावस्थेत रहाणारे मंगळुरू सेवाकेंद्रातील सनातनचे २३ वे व्यष्टी संत पू. विनायक रघुनाथ कर्वेमामा (वय ८२ वर्षे) !
‘आश्विन कृष्ण पक्ष चतुर्थी (२४.१०.२०२१) या दिवशी मंगळुरू सेवाकेंद्रातील सनातनचे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या कृतीतून शिकायला मिळालेली सूत्रे त्यांच्या चरणी समर्पित करते.
१. आदर्श दिनचर्या
‘पू. कर्वेमामा प्राणायाम, व्यायाम, उन्हात बसून उपाय करणे, हे सर्व नियमित करतात. त्यात त्यांच्याकडून कधीही खंड पडत नाही. आहाराविषयीही ते आयुर्वेदाच्या नियमांचे काटेकोर पालन करतात. ते प्रत्येक कृती त्या त्या वेळेतच करतात.
२. नामजप करतांना आणि सत्संगाला आसंदी न घेता अन् पाठ न टेकता १ घंटा बसणे
‘साधकांचे आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत’, यासाठी ते नामजप करतात. त्या वेळी ते आसंदी न घेता एका कापडाच्या आसनावर मागे न टेकता १ घंटा ताठ बसतात. एवढेच नव्हे, तर इतर सत्संगाच्या वेळीही ते मागे न टेकता ताठ बसतात. ‘सतत ईश्वराच्या अनुसंधानात असल्यामुळे त्यांना ते शक्य होते’, असे मला वाटते.
३. सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे
आपत्काळाच्या सिद्धतेच्या दृष्टीने एका विषयाच्या संदर्भात त्यांनी मला माहिती विचारली होती. त्यांनी त्याविषयीची सर्व माहिती घेऊन त्याप्रमाणे सिद्धता केली. तेव्हा ते प्रत्येक वेळी मला दाखवायचे आणि ‘त्यात कशा सुधारणा करायच्या ?’ याविषयी मला नम्रतेने विचारायचे. मला अडचण येऊ नये; म्हणून ते आमचे घर सेवाकेंद्राच्या जवळच असल्याने आमच्या घरी येऊन विचारायचे. त्यांच्याकडून मला नम्रता, शिकण्याची वृत्ती आणि स्वतःकडे न्यूनपणा घेण्याची वृत्ती, हे गुण शिकायला मिळाले.
४. सनातनच्या सर्व ग्रंथांचे अध्ययन केलेले असणे, तसेच त्यांचे दासबोधासारखे ग्रंथ मुखोद्गत असणे
त्यांनी सनातनच्या सर्व ग्रंथांचे अध्ययन केले आहे. रिकाम्या वेळी ते सनातनचे ग्रंथ वाचून गुरुदेवांनी दिलेल्या ज्ञानाचे कृतज्ञताभावाने अध्ययन करतात. त्यातील केवळ विषयच नव्हे, तर त्या ग्रंथांचे मूल्य, भाषा इत्यादी सर्वच त्यांच्या लक्षात असते. केवळ सनातनचेच ग्रंथ नव्हेत, तर दासबोधासारखे ग्रंथ त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांना संत म्हणून घोषित करण्याच्या वेळी मी त्यांच्यासह गोव्यातील रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा ते प्रवासात अखंड ‘मनाचे श्लोक’ (संत रामदासस्वामी विरचित मराठी श्लोक) म्हणत होते. त्यामुळे आम्हा सर्वांचा प्रवास आनंदाने झाला.
५. संतांविषयी गुरुभाव असणे
एकदा मी कारवार येथील त्यांच्या घरी पू. उमेश शेणै यांच्या समवेत गेले होते. त्या वेळी साक्षात् ‘परात्पर गुरु डॉ. आठवलेच त्यांच्या घरी आले आहेत’, असा त्यांचा भाव होता. त्यांनी ‘संत त्यांच्या घरी येणार आहेत’, या भावाने अत्यंत भावपूर्ण रीतीने सर्व सिद्धता केली होती. पू. उमेशअण्णा यांना पहाताच त्यांचा भाव जागृत झाला. सेवाकेंद्रात काही वेळा साधकांसाठी सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंदअण्णा यांचा सत्संग असतो. तेव्हाही ते भावावस्थेत असतात.
६. आनंदाने सेवा करणे
ते कुंकू डबीत भरण्याची सेवा अखंड नामस्मरण करत आनंदाने करतात. त्यात त्यांचे कोणतेही गार्हाणे नसते.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्हाला अशा संतांचा सहवास आणि त्यांचे चैतन्य लाभले. आम्हाला त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळत आहे. यासाठी आम्ही सर्व साधक कृतज्ञ आहोत. ‘आमच्याकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होऊ दे’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करते.’
पू. कर्वेमामांची आध्यात्मिक वचनेअ. अध्यात्मात ‘देवाण-घेवाण’ हिशोब असतो. त्याविषयी बोलतांना ते म्हणाले, ‘‘आपण केवळ द्यावे. घेऊ नये. त्यामुळे मायेचा लेखा संपतो. नवीन लेखा निर्माण करू नये.’’ आ. स्वभावदोष आणि अहं तत्परतेने गुरुचरणी अर्पण करावेत अन् शक्ती, भक्ती आणि चैतन्य मिळवावे. इ. गुरूंनी दिलेले सर्व (ज्ञान) इतरांना द्यावे. स्वतःकडे काहीच ठेवू नये. |
– श्रीमती अश्विनी प्रभु (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), मंगळुरू (१०.१०.२०२१)