नागपूर येथे ‘राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषद’ !
नागपूर – ‘जातीय, आर्थिक, राजकीय आणि वैद्यकीय या सर्व प्रकारांच्या आतंकवादांपासून जगाला मोठा धोका आहे. वैद्यकीय आतंकवादाविषयी यापूर्वी मी वक्तव्य केल्यानंतर गोंधळ झाला होता. राजकीय आतंकवाद सर्वांत वर आहे, तर जातीय आतंकवाद दुसर्या क्रमांकावर आहे. पाण्याचा एक धर्म, आगीचा एक धर्म आणि वार्याचा एक धर्म असतो. त्यामुळे सर्व मानवजातीचा धर्म एकच आहे’, असे मार्गदर्शन योगऋषी रामदेव बाबा यांनी येथे केले. दैनिक ‘लोकमत’ समूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त २४ ऑक्टोबर या दिवशी येथे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदे’त ते ‘धार्मिक सौहार्दाविषयी वैश्विक आव्हाने आणि भारताची भूमिका’ या विषयावर बोलत होते. या परिषदेत विविध धर्मांतील आचार्यांच्या उपस्थितीत या विषयावर मंथन होत आहे.
योगऋषी रामेदव बाबा म्हणाले,
१. मला असे कोणते काम करायचे नाही की, ज्यामुळे माझा देश अपकीर्त होईल. एका अशिक्षित आई-वडिलांच्या घरातून निघालेला माझ्यासारखा मुलगा ७ भाषा बोलतो. मराठी आणि इंग्रजी बोलतो. तुमच्या विचारांत दोष असता कामा नये. तुम्ही कुठून शिकला, कुठून आला, हे विचारात घेतले जाऊ नये.
२. सर्व सृष्टी देवाच्या विधानाने चालते. देश राज्यघटनेने, तर समाज अध्यात्माच्या आधारे चालतो. राजकीय नेते समाज चालवत नाहीत. तपस्वींनी समाज बनवला आहे. भारताला मुख्यत्वे ऋषीमुनींनी बनवले आहे.
सौजन्य : TV9 Marathi
भारतच विश्वाला संकटांपासून वाचवू शकतो ! – भिक्खू संघसेना, संस्थापक, महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्र, लडाख
‘जगभरातील शांततेविषयी मी अधिक काही सांगत नाही. तुम्हा सर्वांना याची माहिती आहे. संपूर्ण विश्व भारताकडे आशेने पहात आहे. ‘भारतच आम्हाला विश्वात निर्माण झालेल्या संकटांपासून वाचवू शकतो’, असे त्यांना वाटते’, असे प्रतिपादन लडाख येथील ‘महाबोधी आंतरराष्ट्रीय ध्यानसाधना केंद्राचे संस्थापक भिक्खू संघसेना यांनी येथे आयोजित केलेल्या ‘राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदे’त केले.
ते पुढे म्हणाले, ‘‘भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारत हा जगाचा विश्वगुरु आहे. भारताची संपत्ती ही पेप्सी आणि कोकाकोला नाही, तर योग आणि ध्यान हे आहे. ‘थिंक थ्रू द हेड, फिल थ्रू द हार्ट, अॅक्ट थ्रू द हॅण्ड’ (डोक्याने विचार करा, हृदयातून अनुभवा, हातांनी कृती करा) हा ‘३ एच्’ मंत्र आहे. भारताला सर्वांत मोठे शांततेचे पुरस्कर्ते लाभले आहेत. ही भूमी भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भगवान महावीर आणि गौतम बुद्ध यांची आहे. त्या सर्वांनी विश्वात भारताचे महत्त्व आणि शांतता पसरवली आहे.’’
भारत विश्वगुरु होऊन शांतता प्रस्थापित करण्यास सक्षम ! – प्रल्हाद वामनराव पै, संस्थापक, जीवनविद्या मिशन
‘भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा देशातील अन्य नेते असोत, सर्वजण विकासाच्या मागे लागले आहेत. त्यामुळे भारत महासत्ता होऊ शकतो, तसेच भारताकडे विश्वगुरु होण्याची क्षमता आहे. विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सक्षम आहे’, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै यांनी येथे केले. येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदे’त ते बोलत होते.