‘सॅफरॉन थिंक टँक’ संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !
मुंबई, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईत होणारा ‘डोंगरी टू नोवेअर’ या शीर्षकाचा विनोदी कार्यक्रम (कॉमेडी शो) रहित करावा, अशी मागणी मुंबई येथील ‘सॅफरॉन थिंक टँक’ या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयी ‘सॅफरॉन थिंक टँक’ संघटनेचे संस्थापक श्री. सिद्धांत मोहिते यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. या निवेदनाची प्रत त्यांनी राज्यपाल, गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त यांसह संबंधित प्रशासकीय यंत्रणेला पाठवली आहे. ‘सॅफरॉन थिंक टँक’ संघटनेच्या या मागणीला सामाजिक प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. २९ ऑक्टोबर या दिवशी बोरीवली येथे प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, तर ३० ऑक्टोबर या दिवशी वांद्रे येथील रंगशारदा नाट्यगृह येथे मुनव्वर फारूकी यांचे कार्यक्रम होणार आहेत.
जानेवारी २०२१ मध्ये इंदौर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफे’मधील एका कार्यक्रमात मुनव्वर फारूकी यांनी हिंदूंच्या देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्या केल्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केल्यामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याची इंदूर येथील कारागृहातून सुटका झाली. जामीनावर त्याची सुटका झाली असली, तरी न्यायालयाने मुनव्वर यांच्यावरील गुन्हे अद्यापही मागे घेतलेले नाहीत. असे असतांना त्याच्या कार्यक्रमांना कुठल्या आधारावर अनुमती दिली जाते ? असा प्रश्न ‘सॅफरॉन थिंक टँक’द्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
प्रभु श्रीरामाचा अवमान करणार्याचा कार्यक्रम आयोजित करणार्यांना लाज वाटली पाहिजे ! – साध्वी सरस्वतीजीप्रभु श्रीरामाचा अवमान करणार्या व्यक्तीचे कार्यक्रम आयोजित करणार्या आयोजकांना लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांनी हिंदु धर्माचा अवमान करणार्यांना ‘देशद्रोही’ म्हणून संबोधले पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम करण्यापासून आजन्म बंदी घातली पाहिजे, असे सामाजिक माध्यमांद्वारे आवाहन करून साध्वी सरस्वतीजी यांनी मुनव्वर फारूकी यांचा मुंबई येथील कार्यक्रम रहित करण्याच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. |