तालिबानला आतंकवादी संघटनेच्या सूचीतून बाहेर काढण्याविषयी विचार करू ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

असे झाल्यास, हा भारतासाठी धोकादायक निर्णय ठरेल ! त्यामुळे भारताचा ‘मित्रराष्ट्र’ असलेल्या रशियाला भारत यापासून परावृत्त करेल का ? – संपादक

(उजवीकडे ) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – अफगाणिस्तानातील परिस्थिती तालिबान ज्या पद्धतीने हाताळत आहे, ते पाहून भविष्यामध्ये तेथे अधिक सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल, असे दिसत आहे. आम्ही लवकरात लवकर तालिबानला आतंकवादी संघटनांच्या सूचीतून बाहेर काढण्याच्या संदर्भातील निर्णयावर विचार करू, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले.

अफगाणिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीचा रशियाने नुकताच आढावा घेतला. मॉस्कोमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये पुतिन बोलत होते. ‘रशियाने हा निर्णय घेतला, तर तालिबान सत्तेत आल्यापासूनचा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांना मिळालेला सर्वांत मोठा पाठिंबा ठरील’, असे म्हटले जात आहे.

पुतिन पुढे म्हणाले की, तालिबानला आतंकवादी संघटनांच्या सूचीतून बाहेर काढण्याचा निर्णय माझा एकट्याचा नाही. आम्ही सातत्याने तालिबानी प्रतिनिधींच्या संपर्कात आहोत. आम्ही तालिबानला मॉस्कोमध्ये येण्यासाठी आमंत्रण दिले आहे. अफगाणिस्तानमध्येही आम्ही त्यांच्यासमवेत संपर्कात रहाणार आहोत. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारचे अस्तित्व हे एक वास्तव असल्याचे आपल्याला मान्य करावे लागेल.