केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र

दिलीप वळसे पाटील

नागपूर – राज्यात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या मागे केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काही नेत्यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी चालू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्वेषण यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे. यापूर्वी असे कधी होत नव्हते. मंत्री वळसे पाटील यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी सकाळी दीक्षाभूमी येथे भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. ‘राज्यातील पोलिसांचे मनोबल उंचावण्यासाठी जिल्हा स्तरावर बैठका घेणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाचे (एन्.सी.बी.) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात काही आक्षेप आहेत. हा विषय आणि अमली पदार्थ प्रकरणात अटकेत असलेला चित्रपट अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान, असे २ विषय वेगळे आहेत. नवाब मलिक यांची वानखेडे यांच्याविरुद्ध तक्रार असल्याने ते सातत्याने त्यांच्या विरोधात बोलत आहेत. परमबीर सिंह यांचा चौकशी अहवाल राज्य सरकारकडे आलेला नाही. हा अहवाल राज्य सरकारकडे आल्यानंतर सिंह यांच्या संदर्भात पुढील कारवाई केली जाईल. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात कोणत्या प्रकरणात त्यांना आरोपी करायचे कि नाही ?, या संदर्भात न्यायालयात उत्तर दिले जाईल.