‘८.२.२०२० या दिवशी श्री. राम होनप, सौ. योया वाले आणि मी नागेशी येथे एका विधीसाठी तेथे गेलो होतो. त्या वेळी तेथे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांचे आई-वडील यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा मला त्यांच्याकडून पुढील सूत्रे शिकायला मिळाली.
१. सौ. माधुरी गाडगीळआजी पुष्कळ रुग्णाईत असूनही आनंदी आणि समाधानी असणे
जेव्हा आम्ही खोलीत गेलो, तेव्हा तेथे गाडगीळआजी पलंगावर बसल्या होत्या. ‘‘तुम्ही कशा आहात ?’’, असे त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मी आनंदी आहे.’’ वास्तविक पहाता त्यांची शारीरिक स्थिती अत्यंत क्षीण आहे. काही दिवसांपूर्वी त्या डाव्या हातावर पडल्यामुळे त्यांच्या डाव्या हातावर थोडी सूज आली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्या पुन्हा पडल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कपाळावर उजव्या बाजूला खोक पडली होती. त्याचे व्रण अजूनही दिसत होते. अशा स्थितीत असूनही त्यांच्या तोंडवळ्यावर निराळेच तेज दिसत होते. त्या खरोखरच पुष्कळ आनंदी आणि समाधानी असल्याचे जाणवत होते. ‘त्यांच्या शारीरिक स्थितीचा, दुखण्याचा किंवा वेदनेचा परिणाम त्यांच्या मनावर लेषमात्रही झालेला नाही’, असे जाणवत होते. आजींची वाटचाल अव्यक्त भावाकडे चालू असल्यामुळे ‘त्या शब्दांतून अधिक न बोलता शांत राहून संभाषणात सहभागी होतात’, असे जाणवले.
२. श्री. माधव गाडगीळआजोबा पुष्कळ उत्साही आणि आनंदी असल्याचे जाणवणे
गाडगीळआजोबांचे वय पुष्कळ असूनही ते अधिकाधिक सेवा आणि साधना करण्याचा प्रयत्न अगदी मनापासून करत असल्याचे जाणवते. या वयातही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवण्यासारख्या आहे. ते नेहमी आनंदी असतात. त्यांच्या निखळ हास्यातून त्यांच्या मनातील आनंद सहज व्यक्त होतो. त्यांचा तोंडवळाही तेजस्वी आणि लहान मुलाप्रमाणे निरागस दिसतो. त्यांचा स्वभाव बोलका असल्यामुळे ते मनमोकळेपणे आमच्याशी बोलत होते. त्यामुळे त्यांच्याशी कौटुंबिक सदस्यांप्रमाणे जवळीक जाणवली.
३. दोघांविषयी जाणवलेली सामाईक गुणवैशिष्ट्ये
३ अ. दोघांमध्ये प्रेमभाव आणि आपुलकी असणे : आम्ही पुष्कळ मासांनी एकमेकांना भेटल्यामुळे गाडगीळ आजी आणि आजोबा या दोघांनीही आमची अन् आमच्या कुटुंबियांची पुष्कळ आत्मीयतेने विचारपूस केली. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात पुष्कळ प्रेमभाव अन् आपुलकी जाणवत होती.
३ आ. दोघांमध्ये संत, सद्गुरु, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि देवता यांच्याप्रती पुष्कळ भाव असणे : त्यांच्याशी बोलत असतांना त्यांच्या मनामध्ये संत, सद्गुरु, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि देवता यांच्याप्रती पुष्कळ भाव असल्याचे जाणवले. गाडगीळआजोबा जेव्हा त्यांच्या स्नुषा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना आलेल्या अनुभूतीच्या संदर्भात आम्हाला सांगत होते, तेव्हा त्यांचा भावपूर्ण आवाज ऐकून माझी भावजागृती होऊ लागली. ‘‘आजी तुम्ही आनंदी दिसता’’, असे मी गाडगीळआजींना म्हटल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘सर्व परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.’’ ‘त्या दोघांच्या भावामुळे त्यांच्या खोलीतील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र आणि भगवान श्रीकृष्णाचे चित्र सजीव झाले आहे, त्यांचा रंग फिकट होऊन त्यांच्यावर पांढरी आभा आलेली आहे आणि ‘त्यांच्यामध्ये निर्गुण चैतन्याचे प्रमाण वाढलेले आहे’, असे जाणवते. तसेच आपण ज्या दिशेला जाऊ, त्या दिशेने चित्रातील श्रीकृष्ण फिरतो. हा श्रीकृष्ण इतका सजीव झालेला आहे की, त्याची दृष्टीही आपल्या दिशेने फिरतांना जाणवते. ‘हे केवळ गाडगीळ आजी आणि आजोबा यांच्यातील भावामुळे झाले आहे’, असे जाणवते.
३ इ. ‘गाडगीळ आजी-आजोबा खर्या अर्थाने आध्यात्मिक जीवन जगत असल्यामुळे ‘त्यांना श्रीगुरुकृपेमुळे आनंदी रहाण्याची कला अवगत झालेली आहे’, असे जाणवणे : ते आध्यात्मिक स्तरावर जीवन जगत आहेत. ‘ते जीवनातील प्रत्येक प्रसंग, घटना किंवा नाती यांकडे मानसिक किंवा बौद्धिक स्तरावर न पहाता आध्यात्मिक दृष्टीकोनातून पहातात’, असे जाणवते. ते खर्या अर्थाने आध्यात्मिक जीवन जगत आहेत. त्यामुळे ‘त्यांना श्रीगुरुकृपेमुळे आनंदी रहाण्याची कला अवगत झालेली आहे’, असे जाणवते. ते त्यांच्या मुलाकडे मुलगा म्हणून न पहाता ‘सद्गुरु’ आणि सुनेकडे सून म्हणून न पहाता ‘श्रीचित्शक्ति’ म्हणून पहातात. यावरूनच त्यांच्यातील निस्सीम भावाची प्रचीती येते.
३ ई. गाडगीळ आजी आणि आजोबा यांनी प्रारब्धभोग भोगत साधनारूपी तप केल्यामुळे गुरुमाऊली त्यांच्यावर प्रसन्न झालेली असणे आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात अन् त्यांच्या खोलीमध्ये पुष्कळ सात्त्विकता, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती जाणवणे : ते दोघेही मायेपासून अलिप्त असल्याचे जाणवते. त्यांच्यामध्ये ‘वैराग्य’ हा दैवी गुण प्र्रबळ असल्याचे जाणवते. त्यामुळे ‘ते मायेत असूनही नसल्याप्रमाणे आहेत’, असे वाटते. त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक साधनेमुळे त्यांच्या चित्तावरील संस्कारही न्यून झाल्याचे जाणवते. त्यामुळे त्यांचे मन लहान मुलांच्या मनाप्रमाणे निर्मळ जाणवते आणि त्यांचा तोंडवळा निरागस दिसतो. ‘त्यांनी प्रारब्धभोग भोगत साधनारूपी तप केल्यामुळे गुरुमाऊली त्यांच्यावर प्रसन्न झालेली आहे’, असे जाणवते. त्यामुळे त्यांच्या सहवासात आणि त्यांच्या खोलीमध्ये पुष्कळ सात्त्विकता, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती जाणवते. त्यांच्यातील ‘ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ, देवाशी अखंड अनुसंधान, विरक्ती, प्रीती, कृतज्ञताभाव आणि विनम्रता’, या गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती लवकर होईल’, असे वाटते.
अनुभूती
गाडगीळ आजी आणि आजोबा यांना भेटून झाल्यावर मी खोलीतून बाहेर पडण्यापूर्वी माझ्या मनात ‘त्यांना वाकून नमस्कार करूया’, असे वाटले. त्यामुळे मी त्यांना वाकून नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या चरणांतून माझ्या दिशेने चैतन्य येतांना जाणवले आणि मला आध्यात्मिक लाभ झाले.
कृतज्ञता
‘हे भगवंता, तुझ्या कृपेने मला गाडगीळ आजी आणि आजोबा यांचा सहवास लाभून त्यांच्याकडून विविध गुण शिकायला मिळाले’, यासाठी मी तुझ्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |