पुणे, २० ऑक्टोबर – विश्वशांती केंद्र (आळंदी), ‘माईर्स एम्.आय.टी. शिक्षण संस्था समूह’ आणि ‘एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी’ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडमधील बद्रीनाथ धाम येथील माणागाव येथे श्री सरस्वती ज्ञान-विज्ञान मंदिराचे उद्घाटन आणि लोकार्पण २१ ऑक्टोबर या दिवशी सकाळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री माननीय भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ११ वाजता होणार आहे, अशी माहिती एम्.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मंदिरामध्ये श्री सरस्वती देवी, श्री गणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री दत्तात्रेय, श्री हनुमान, संत श्री ज्ञानेश्वर, संत श्री तुकाराम महाराज, भगवान श्री वेदव्यास यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासह या जागेशी संबंधित असलेले ५ पांडव आणि द्रौपदी माता यांच्या मूर्तींचीही स्थापना करण्यात येणार आहे.
कराड म्हणाले की, विज्ञान आणि अध्यात्म यांच्या समन्वयातून विश्व शांती नांदेड या स्वामी विवेकानंद यांच्या वचनावर श्रद्धा ठेवून निकोप आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे ज्ञानतीर्थ क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या संगमातून हे तीर्थस्थान ज्ञान देणारे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल. हे मंदिराचे कार्य ईश्वरी कृपेने पार पडले आहे.
श्री सरस्वती मंदिर, माणा येथे २१ ते २७ ऑक्टोबर २०२१ या काळात श्रीमद्भागवत कथा, प्रवचन, भजन-कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, विशेष पाहुणे म्हणून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत हे तर अध्यक्षस्थानी नालंदा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. विजय भटकर हे उपस्थित असतील.