भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

भारतातील स्थिती पालटली नाही, तर १० वर्षांनंतर येथील हिंदूंना शरणार्थी बनावे लागेल !

साध्वी कांचन गिरीजी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी १८ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली

मुंबई – पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे. साध्वी कांचन गिरीजी यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील ‘कृष्णकुंज’ या त्यांच्या निवासस्थानी १८ ऑक्टोबर या दिवशी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी जगद्गुरु सूर्याचार्यजी हेही उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली होती. त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

साध्वी कांचन गिरीजी पुढे म्हणाल्या की,

१. भारत ‘हिंदु राष्ट्र’ व्हावे, ही आमची इच्छा आहे. आमची विचारसरणी राज ठाकरे यांच्याशी जुळते. आज हिंदूंची स्थिती बिकट आहे. त्यामुळे हिंदुत्वाची विचारसरणी असणार्‍या सर्व नेत्यांनी एकत्र आले पाहिजे.

२. अफगाणिस्तानची काय स्थिती झाली, हे आपण सर्वजण पहात आहोत. हिंदुस्थानमध्ये तशीच धोकादायक परिस्थिती उद्भवली आहे. १० वर्षांनंतर हिंदूंना शरणार्थी बनावे लागेल. आज हिंदू जागे झाले नाहीत, तर कधीच जागे होणार नाहीत.

३. काश्मीर आज नाही, तर पुष्कळ आधीपासून जळत आहे. हे सर्व नेहरू आणि गांधी यांच्यामुळे झाले आहे. पाकिस्तानला वेगळे केले नसते, तर काश्मीर जळले असते का ? फाळणी का करण्यात आली ?

४. जुना इतिहास आहे की, संतांनी नेतृत्व केले आहे. चंद्रगुप्त मौर्य यांना आर्य चाणक्य यांनी घडवले. राजकीय नेत्यांना मार्गदर्शन करणे, हे संतांचे कामच आहे.

साध्वी कांचन गिरीजी यांचा परिचय !

साध्वी कांचन गिरीजी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या अंतर्गत त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे अभियान हाती घेतले आहे. ‘भारत हिंदु राष्ट्र व्हावे’, यासाठी त्यांनी देशभर दौरे चालू केले आहेत. या दौर्‍यांत त्या संत आणि समविचारी राजकीय नेते यांच्याशी चर्चा करत आहेत.