नवी मुंबई – दिवाळीसाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना २५ सहस्र रुपये, तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचार्यांना १९ सहस्र रुपये आणि ‘आशा’ कर्मचार्यांना (‘वर्कर’) ९ सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्त अभिजित बांगर यांनी घेतला आहे.
१. महापालिका आस्थापनातील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा यांतील शिक्षक, राज्यशासनाकडून प्रतिनियुक्तीने आलेले अधिकारी-कर्मचारी यांनाही हे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे किमान वेतनावरील तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीवरील वेतनश्रेणीमध्ये कार्यरत असणारे अधिकारी-कर्मचारी, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, मानधनावरील बालवाडी शिक्षक आणि मदतनीस यांनाही १९ सहस्र रुपये देण्यात येणार आहे.
२. ‘सर्व शिक्षा अभियान’ आणि ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ यांच्या अंतर्गत शासनाने कंत्राटी तत्त्वावर नेमलेले कंत्राटी कर्मचारी यांनाही करार पद्धतीवरील कर्मचार्यांप्रमाणे १९ सहस्र रुपये देण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण ४ सहस्र ५८२ अधिकारी आणि कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल.