कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

सर्वच वाचकांना स्वतःच्या पाल्यांवर संस्कार कसे करावेत ? हे कळण्यासाठी उपयुक्त असलेली लेखमालिका !

‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत.

१० ऑक्टोबर २०२१ या दिवशी आपण प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले आणि त्यांचे संत कुटुंबीय यांच्या छायाचित्रांतून पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) या उपकरणाद्वारे केलेले निरीक्षण पाहिले. आज त्यापुढील भाग येथे पाहूया.

(भाग ४)

तृतीय भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/517755.html

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दादा आठवले

४. प.पू. दादांच्या लिखाणाच्या संदर्भातील वैशिष्ट्ये

४ अ. ‘एखादे पुस्तक किंवा ग्रंथ वाचतांना आवडलेले, नवीन शिकवणारे लिखाण ते वहीत लिहून ठेवत आणि नंतर ते अधून मधून स्वतः वाचत.

४ आ. डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या मामास लिहिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण पत्राची प्रत प.पू. दादांनी लिहून संग्रही ठेवणे

४ आ १. १९७५ या वर्षीचे (वय ३३ वर्षे) विचार : दादांची कागदपत्रे चाळतांना आज मला पुढील पत्र मिळाले.

ब्रिटन                                                                                  १२.६.१९७५

ती. मामास,

सा.न.वि.वि.

ती. दादा आणि ती. ताई माझे आदर्श आई-वडील आहेत. त्यांनी मला चार चांगल्या भावांसह सर्वकाही दिले अन् शिकवले. त्यांच्या जीवनात ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांचे फारच क्वचित् आढळून येणारे तात्त्विक आणि प्रायोगिक एकत्रिकरण आहे. त्यांच्या पोटी जन्म दिल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत कृतज्ञ आहे.’ (खंड १)

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले

४ इ. प.पू. दादांनी दैनंदिन कृती भावाच्या स्तरावर करून ईश्वरी कृपा अनुभवण्याचा मार्ग दाखवणे : ‘प.पू. दादांनी भक्तीयोगावर आधारित अनेक सुवचने आणि सूत्रे लिहिली आहेत. त्यामधून त्यांनी दैनंदिन कृती भावाच्या स्तरावर करून ईश्वरी कृपा अनुभवण्याचा मार्ग दाखवला आहे. सनातनचे ग्रंथ अध्यात्मशास्त्रावर वैज्ञानिक शैलीत आणि आधुनिक भाषेत लिहिलेले आहेत. प.पू. दादांनी केलेल्या लिखाणामुळे त्यांतील भक्तीयोगाची न्यूनता भरून निघाली.

‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे प.पू. दादांच्या लिखाणाचा अमूल्य ठेवा आम्हाला मिळाला. यासाठी आम्ही आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’

– सौ. मंजिरी आगवेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१३) (खंड ३)

४ ई. प.पू. दादांच्या लिखाणात सर्वसाधारण व्यक्तीलाही साधक बनवण्याची क्षमता असणे आणि ‘त्यांनी दैनंदिन जीवनात घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींतून ईश्वराला कसे आठवायचे ?’, हे लिखाणातून नेमकेपणाने दाखवणे : ‘प.पू. दादांच्या इंग्रजी लिखाणाचे भाषांतर करण्याची सेवा मला मिळाली. त्यांचे इंग्रजी किंवा मराठी लिखाण असो, त्यात सात्त्विकता जाणवते. सर्वसामान्यांना समजावे, यासाठी त्यांनी सोपी भाषाशैली वापरली आहे. ‘दैनंदिन जीवनात घडणार्‍या छोट्या छोट्या गोष्टींतून ईश्वराला कसे आठवायचे ?’, हे त्यांनी लिखाणातून नेमकेपणाने दाखवले आहे. जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा त्यात उल्लेख असल्याने ‘जीवनात अध्यात्म कसे जगावे ?’, याची गुरुकिल्लीच आपल्याला दिली आहे.’

– आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (भाषांतरकार), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०१४) (खंड ३)

४ उ. ‘प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या सूत्राचे बीज प.पू. दादांच्या लिखाणात असल्याचे जाणवणे आणि कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘प.पू. दादांनी लिहिलेल्या ‘सुगम अध्यात्मशास्त्र’ हा ग्रंथ अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत असून सर्वसामान्यांचा विचार करून लिहिला असल्याचे मला जाणवले. ‘जीवनातील प्रत्येक अंग हे अध्यात्मशास्त्राशी निगडित आहे. हे शास्त्र शिकणे आणि आत्मसात करणे, हेच जीवनाचे खरे सार आहे’, हे पैलू त्यांनी या ग्रंथात अत्यंत सुंदररित्या उलगडून दाखवले आहेत. ‘प्रत्येक गोष्टीचे अध्यात्मीकरण करणे’, या परात्पर गुरु डॉक्टरांच्या सूत्राचे बीज प.पू. दादांच्या या लिखाणात असल्याचे जाणवले आणि प.पू. दादांविषयीचा कृतज्ञताभाव जागृत झाला.’ – श्री. रोहित साळुंके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०१४) (१ ते ३) (खंड ३)

४ ऊ. लिखाणातील विषय

४ ऊ १. ‘प.पू. दादांच्या गोष्टी, कविता, लेख इत्यादी सर्व लिखाणांचा केंद्रबिंदू ‘अध्यात्म’ आहे.

४ ऊ २. तात्त्विक माहितीपेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याच्या संदर्भातील लिखाण : लिखाणात तात्त्विक माहितीपेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याच्या संदर्भात अधिक माहिती आहे; कारण अध्यात्म हा केवळ वाचण्याचा नाही, तर कृतीचा विषय आहे.

४ ए. प.पू. दादांनी त्यांच्या लिखाणाच्या संदर्भात व्यक्त केलेले विचार

‘फोडिलें भांडार धन्याचा हा माल ।
मी तंव हामाल भारवाही ।।

– तुकाराम गाथा, अभंग ६९०, ओवी ३

अर्थ : मी ईश्वराचे ज्ञानभांडार फोडले आहे. हे सर्व ज्ञान त्याचेच आहे. मी केवळ त्या ज्ञानाचा भारवाहक (हमाल) आहे.

या संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे माझ्या लिखाणाशी माझा एवढाच काय तो संबंध ! हे भांडार संतांचेच आहे. मी निमित्तमात्र आहे. बोलविता धनी वेगळाच आहे !’ – (प.पू.) बाळाजी वासुदेव आठवले (वर्ष १९९०)’ (खंड १)

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले  (क्रमशः)

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती, म्हणजे प.पू. दादांचे लिखाण !

लिखाण करतांना प.पू. बाळाजी (दादा) आठवले

१. संस्कार

बर्‍याच जणांना ‘वडिलोपार्जित संपत्ती’ म्हणजे घर, पैसे इत्यादी वाटते. आम्हा पाचही भावंडांच्या संदर्भात वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे ‘आई-वडिलांनी केलेले संस्कार आणि साधनेची आवड’, असे म्हणता येईल. व्यावहारिक गोष्टींपेक्षा ही संपत्ती अनमोल आहे.

२. चांगल्या लिखाणाची टाचणे करणे आणि ग्रंथलिखाण

वडिलांनी सेवानिवृत्त झाल्यावर शेवटपर्यंत अध्यात्मविषयक लिखाण स्वयंस्फूर्तीने केले किंवा ग्रंथांतून टाचणे काढली. दादांना अध्यात्माची आवड असल्याने ते अनेक ग्रंथांचे वाचन करायचे. त्यांच्या वेळी संगणकाची सोय नसल्याने ते महत्त्वाचे लिखाण वहीत लिहायचे. अशा त्यांच्या कित्येक वह्या आजही मला ग्रंथलेखन करतांना साहाय्यभूत होतात. एवढेच नाही, तर ग्रंथ छापायला देतांना अनुक्रमणिका करून लिखाण लावतो, त्याप्रमाणे बहुतेक सर्वच ग्रंथांची हस्तलिखिते त्यांनी तयार केली. ती हस्तलिखिते मराठी अन् इंग्रजी अशा दोन्ही भाषांत आहेत. वडिलोपार्जित संपत्तीच्या संदर्भात माझ्या संदर्भात असे म्हणता येईल की, दोन खोके भरतील, एवढी हस्तलिखिते त्यांनी मला दिल्यामुळे मला ग्रंथलिखाण करण्यास साहाय्य झाले.

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (खंड १)