कर्नाटकातील भाजपच्या आमदारांच्या धर्मांतरित आईसमवेत ४ कुटुंबांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !

  • ख्रिस्ती धर्मप्रचारक हिंदुत्वनिष्ठ पक्ष असलेल्या आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपच्याच आमदाराच्या आईचे धर्मांतर करण्यास धजावतात, यावरून त्यांना कशाचेच भय राहिले नसल्याचे स्पष्ट होते !
  • धर्मांतराचा फटका स्वपक्षाच्याच लोकप्रतिनिधींना बसला असतांना आता तरी केंद्रातील भाजप सरकार धर्मांतर विरोधी कायदा करणार का ?
आमदार गूळीहट्टी शेखर आणि आमदार गूळीहट्टी शेखर यांच्या आई

बेंगळुरू – कर्नाटक विधानसभेमध्ये हिंदूंच्या धर्मांतराचे सूत्र उपस्थित करणारे चित्रदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे आमदार गूळीहट्टी शेखर यांच्या धर्मांतर केलेल्या आईसमवेत ४ कुटुंबांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. आमदार शेखर यांनी सांगितले की, असे करून या सर्वांनी त्यांची चूक सुधारली आहे. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणार्‍यांनी सर्वप्रथम मंदिरात जाऊन पूजाअर्चा केली. आमदार शेखर यांनी सांगितले की, या सर्वांना फूस लावून त्यांचे धर्मांतर करण्यात आले होते.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सूत्र उपस्थित करतांना आमदार शेखर यांनी दावा केला होता की, ख्रिस्त्यांनी त्यांच्या आईसमवेत २० सहस्रांहून अधिक लोकांचे धर्मांतर केले आहे. (एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत असतांना सरकारी यंत्रणा झोपल्या होत्या का ? – संपादक) या वेळी त्यांनी ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यांनी हेही सांगितले होते की, जे लोक ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा विरोध करतात, त्यांना ख्रिस्ती धर्मप्रचारक खोट्या प्रकरणांमध्ये गोवतात. (यावरून ख्रिस्ती धर्मप्रचारक किती उद्दाम झाले आहेत ? हे स्पष्ट होते ! – संपादक) यासंदर्भात राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांना कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या वेळी आमदार शेखर यांनी सांगितले होते की, धर्मांतर केल्यानंतर त्यांच्या आईला कपाळावर कुंकू लावण्यास मनाई करण्यात आली होती. त्यांची आई त्यांच्या देवघरातील देवतांच्या चित्रांकडे पहातही नव्हती.