मुंबई – पुण्यातील भोसरी येथील भूमी गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास अटक न करण्याचे निर्देश अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहेत.
भोसरी येथील भूमी गैरव्यवहार प्रकरणी खडसे कुटुंबियांविरोधात ईडीने आरोपपत्र प्रविष्ट केले. खटल्याला अनुपस्थित राहिल्याने पी.एम्.एल्.ए. (धनशोध निवारण अधिनियम) न्यायालयाने मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले. न्यायालयाने म्हटले की, खडसे यांनी १७ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरपर्यंत तपासात सहकार्य करावे. आठवड्यातून दोनदा ईडी कार्यालयात उपस्थित रहावे. या काळात मंदाकिनी खडसे यांना अटक झाल्यास त्यांची १५ सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी दिले आहेत.