‘हिंदु’ ही एकच जात आहे ! – भैय्याजी जोशी, सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी

नाशिक – ग्रंथ आणि धर्म यांना जात नाही, तसेच हिंदु धर्मात मारवाडी, ब्राह्मण, मराठा अशा आपण जाती मानतो; मात्र खरे तर ‘हिंदु’ ही एकच जात आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी १५ ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यातील लासलगाव येथे केले. ते विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात स्वयंसेवकांना संबोधित करतांना बोलत होते.

भैय्याजी जोशी पुढे म्हणाले की, ‘हिंदु’ शक्तिशाली असेल, तर देशात चांगले काम होईल. स्वतःला ‘हिंदु’ म्हणून घेतात त्यांनी जागरूक राहिले पाहिजे. या देशात १०० कोटींपेक्षा अधिक हिंदू आहेत; पण ते अनेक जातींत विभागले गेल्याने ‘हिंदु’ (समाज) एकसंघ राहिला नाही. आपण राज्याराज्यात विभागलो आहोत; मात्र एका देशात रहातो. ‘आपला देश एक आहे’, हीच संघाची शिकवण आहे. देश गुलाम नाही; पण आपले विचार गुलाम राहिले, तर देश गुलाम होईल. आपल्याकडे १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी देशभक्ती दिसून येते; मात्र इतर दिवशी देशभक्ती कुठे जाते ? भारतियांनी विदेशी वस्तूंचा त्याग करून स्वदेशी वस्तू वापराव्यात. देशात दुर्गेची पूजा होते; पण महिलांवर अत्याचार का होतात ? वारकरी संप्रदायामध्ये चांगले विचार आहेत. ते आचरणात आणले पाहिजेत.