१. साधकांना सेवेचे गांभीर्य लक्षात आणून देणे
‘अष्टम् अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची सेवा करतांना विक्रमदादांनी सेवा करणार्या साधकांना सेवेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे सर्व साधक गांभीर्याने सेवा करू लागले. दादांनी सेवेची व्याप्ती सांगून साधकांकडून होणार्या चुका न्यून व्हाव्यात, यासाठी साहाय्य केले. त्यामुळे साधकांना परिणामकारक सेवा करता आली.
२. श्री. विक्रम डोंगरे घेत असलेल्या सत्संगाची वैशिष्ट्ये
२ अ. सत्संगात सहजता आणि अंतर्मुखता रहाण्यासाठी प्रयत्न केल्याने सत्संगात चैतन्य जाणवणे : विक्रमदादा साधकांचा सत्संग घेतांना तो वेळेत चालू करून वेळेत संपवत. त्यामुळे साधकांमध्ये ‘वक्तशीरपणा’ हा गुण वाढण्यास साहाय्य झाले. ते सत्संगाचे संचालन आदर्श पद्धतीने करत. त्यामुळे ‘साधकांना कंटाळा आला किंवा त्यांचे लक्ष विचलित झाले’, असे होत नसे. दादा ‘सत्संगातील सूत्रे सर्व साधकांच्या लक्षात येत आहेत ना ?’, याविषयी सतर्क असत. ते सत्संगात तितक्याच अंतर्मुखतेने सूत्रे सांगत. अशा मनमोकळ्या वातावरणामुळे साधक मनापासून सत्संगात सहभागी होत आणि त्यामुळे सत्संगात पुष्कळ चैतन्य जाणवत असे.
२ आ. साधकांना प्रोत्साहन देतांना प्रेमाने आणि स्पष्टपणे त्यांच्या चुकाही सांगणे : सत्संगात साधक सूत्रे सांगत असतांना दादा ती अत्यंत लक्षपूर्वक ऐकत आणि तत्परतेने त्यांना मार्गदर्शन करत. साधकांचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, या गोष्टी दादा सहजतेने करत. ते साधकांशी प्रेमाने आणि आदराने बोलायचे आणि त्यांच्या चुकाही सांगायचे. त्यामुळे साधकांना चुकांची जाणीव व्हायची. सत्संगामुळे ‘साधकांमध्ये आपलेपणा आणि संघटितपणा वाढला’, असे मला जाणवले.
२ इ. साधकांची सर्वांगाने साधना होण्यासाठी दादांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सेवेतून साधना होऊन साधकांना आनंद मिळू लागणे : दादा साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना व्हावी, यासाठी प्रयत्नशील असायचे. ‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न होत आहेत ना ?’, ‘साधक भावपूर्ण सेवा करत आहे ना ?’, ‘सेवेशी संबंधित सूत्रे साधक पूर्ण करत आहेत ना ?’ याविषयी दादा सतर्क असत. सेवेतून साधना होऊ लागल्याने सर्व साधकांना आनंद मिळू लागला. ‘गुरुकृपेचा ओघ कसा मिळवावा ?’, याचे गमक दादांच्या मार्गदर्शनातून मिळाले. दादांनी सांगितलेल्या सूत्रांचे तंतोतंत पालन केले, तरी साधकांची साधना परिपूर्ण होण्यास साहाय्य होईल’, असे मला वाटते.’
– श्री. दत्तात्रेय पिसे (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सोलापूर (२७.७.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |