नवरात्रोत्सवात प्रतिघंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शन मिळावे असे नियोजन ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती

कोल्हापूर, ९ ऑक्टोबर (वार्ता.) – कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात सद्यःस्थितीत प्रतिघंट्याला ७०० भाविकांना ‘ई-दर्शन पास’द्वारे नोंदणी केल्यावर दर्शन देण्यात येत आहे. भाविकांची वाढती संख्या पहाता ८ ऑक्टोबर या दिवशी प्रायोगिक तत्त्वावर ९०० भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. ९ ऑक्टोबरपासून प्रतिघंट्याला १ सहस्र भाविकांना दर्शनासाठी सोडण्याचे नियोजन आहे. हे शक्य झाल्यास प्रतिदिन १५ सहस्र भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली.

भाविक दर्शन घेण्यासाठी देवस्थान समितीच्या ‘ई-दर्शन पास’वर मोठ्या संख्येने भेट देत असल्याने ९ ऑक्टोबर या दिवशी देवस्थान समितीची ‘साईट’ वारंवार ‘हँग’ (बंद पडणे) होत होती. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते.

जोतिबा देवस्थान येथे व्यवस्थापन समितीच्या नियोजनाच्या बोजवार्‍यामुळे भाविकांचे दर्शनासाठी हाल !

जोतिबा – श्री महालक्ष्मीदेवी मंदिराप्रमाणेच जोतिबा देवस्थान येथेही ‘ई-पास’द्वारे भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र व्यवस्थापन समितीच्या नियोजनाच्या बोजवार्‍यामुळे भाविकांचे दर्शनासाठी हाल होत आहेत. पाससाठी ‘नेटवर्क’ न मिळणे ही सर्वांत मुख्य समस्या असून भाविकांना योग्य माहिती न मिळणे, यामुळे भाविकांना भर उन्हात थांबावे लागत आहे. विशेषकरून वयोवृद्ध भाविकांना याचा त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे. कर्नाटकातून येणार्‍या भाविकांना भाषेची अडचण येत असून ‘ई-पास’ न मिळाल्याने अनेकांना केवळ शिखराचे दर्शन घेऊन परतावे लागत आहे. (अनेक मासांनंतर मंदिरे उघडल्याने शेकडो किलोमीटर अंतरावरून येणार्‍या भाविकांना दर्शन मिळावे यांसाठी तांत्रिक त्रुटी दूर करून भाविकांना सुलभरितीने दर्शन कसे मिळेल ? यासाठी देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रयत्न करणे अपेक्षित आहे ! – संपादक)