हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील देवी स्कंदमातेचे कार्य (सरस्वती कथा)

१. ज्ञानशक्तीमध्ये वाईटाचे रूपांतर चांगल्यामध्ये करण्याची शक्ती असणे, त्याचप्रमाणे विश्वाच्या कल्याणासाठी वाईटाला जन्म देण्याचीही शक्ती असणे

‘आदिशक्तीचे स्कंदमाता हे ज्ञानदायिनी रूप आहे. गुरूंकडून शिष्याकडे ज्ञान प्रवाहित होत असते. ज्ञानाचा तो प्रवाह मातृस्वरूप आहे. या मातृस्वरूप ज्ञानप्रवाहाला ‘सरस्वती’, असे म्हटले आहे. ‘इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती’, हे आदिशक्तीचे स्वरूप आहे. ज्ञानशक्तीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. ज्ञानशक्ती वाल्याकोळ्याचे रूपांतर वाल्मीकि ऋषींमध्ये करू शकते किंवा राजा कौशिक याचे रूपांतर विश्वामित्र ऋषींमध्ये करू शकते. ज्ञानशक्तीमध्ये वाईटाचे रूपांतर चांगल्यात करण्याची क्षमता आहे, त्याचप्रमाणे विश्वाच्या कल्याणासाठी वाईटाला जन्म देण्याची शक्तीही ज्ञानशक्तीमध्येच आहे. हे मर्म, म्हणजे आदिशक्तीचे ‘वाक्देवी’ स्वरूप होय ! ‘हे कसे घडते ?’, हे जाणण्यासाठी आपल्याला श्रीरामाच्या त्रेतायुगात जावे लागेल.

२. श्रीरामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी आदिशक्तीने मंथरेच्या माध्यमातून कैकयीच्या चांगल्या बुद्धीत पालट घडवून आणणे आणि त्यामुळे श्रीरामाचा राज्याभिषेक न होता त्याला वनवासाला जावे लागणे

श्री. विनायक शानभाग

२ अ. अयोध्येत श्रीरामाचा राज्याभिषेक होणार म्हणून आनंदाचे वातावरण असणे : राजा दशरथ मोठ्या आनंदाने श्रीरामाच्या राज्याभिषेकाची सिद्धता करत असतो. राज्याभिषेकाच्या आदल्या दिवसापर्यंत अयोध्येत सर्वत्र आनंदाचे वातावरण होते; मात्र श्रीरामाला ‘माझा राज्याभिषेक होणार नाही. मला वनवासात जावे लागणार आहे. रावण सीतेचे हरण करील. त्यामुळे मला रावणाशी युद्ध करावे लागून त्याचा वध होईल’, हे ठाऊक होते.

२ आ. आदिशक्तीने सरस्वतीच्या रूपात मंथरेमध्ये प्रवेश करणे आणि कैकेयीच्या सुबुद्धीचे रूपांतर कुबुद्धीमध्ये करणे : पूर्वनियोजनाप्रमाणे आदिशक्ति सरस्वतीच्या रूपात मंथरेमध्ये प्रवेश करते. अयोध्येतील आनंदाचे वातावरण पाहून मंथरा विचारपूस करते. तेव्हा तिला ‘उद्या श्रीरामाचा राज्याभिषेक होणार आहे’, असे कळते. तेव्हा मंथरा कैकेयीला म्हणते, ‘‘रामाला राज्य मिळाले, तर भरत कधीही राजसिंहासनावर बसणार नाही. ‘भरताला राजसिंहासन मिळण्यासाठी काय करावे ?’, याची युक्ती मंथरा कैकेयीला सांगते. तोपर्यंत सुबुद्धी असलेल्या कैकेयीमध्ये देवी सरस्वती कुबुद्धी निर्माण करते. अखेर कैकेयीच्या हट्टापुढे राजा दशरथाला रामाला वनवासात पाठवावे लागते. वाक्देवी सरस्वतीमुळे अयोध्येतील आनंदाची परिस्थिती संपूर्ण पालटते.

या प्रसंगात भगवंताची दैवी लीलाच कार्यरत होती. भगवंत आपली लीला आदिशक्तीच्या सहाय्याने पूर्ण करतो; म्हणूनच आदिशक्तीला ‘महामाया’ असेही म्हटले आहे.’

(साभार : अध्यात्म रामायण)

३. वर्ष १९९९ मध्येच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘वैश्विक (तिसरे) महायुद्ध होईल आणि त्यानंतर हिंदु राष्ट्राची स्थापना होईल’, असे सांगितले असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी २० वर्षांपूर्वीच साधकांना सांगितले होते, ‘पुढे महाभयंकर असे तिसरे विश्वयुद्ध होईल आणि नंतर ईश्वरी राज्य स्थापन होईल.’ गुरुदेव कधीही असत्य बोलत नाहीत आणि गुरुदेवांचे बोल कधीही असत्य होत नाहीत ! वर्ष १९९९ मध्येच गुरुदेवांनी ईश्वरी राज्य येण्याचा संकेत दिला होता !

४. वर्तमान स्थितीतही नैसर्गिक आपत्ती किंवा युद्ध होण्याचे संकेत दिसणे

आताच्या वर्तमानातील कलियुगात भगवंताचे धर्मसंस्थापनेचे कार्य आदिशक्तीच करत आहे. वैश्विक परिवर्तन होते, तेव्हा विश्वक्रांती अवश्य घडते. या विश्वक्रांतीचे कलियुगातील स्वरूप म्हणजे विश्वयुद्ध आणि नैसर्गिक आपत्ती ! सध्या अनेक राष्ट्रे ‘कोरोना विषाणूचा संसर्ग हे जैविक युद्ध आहे’, असे संकेत देत आहेत.

थोडक्यात सांगायचे झाले, तर ब्रह्मांड ज्या आदिशक्तीच्या अधीन आहे, त्या ब्रह्मांडातील ही छोटीशी पृथ्वी आणि त्या छोट्याशा पृथ्वीवरील मानवही आदिशक्तीच्याच अधीन आहे. तिच्या इच्छेविना मनुष्य काहीही करू शकत नाही. ‘हे जगत्मोहिनी, महामायास्वरूपिणी, विश्वधारिणी, भवभयतारिणी आणि ज्ञानप्रदायिनी देवी, आम्हा साधकांवर तुझी कृपा अखंड राहू दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१७.९.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.