सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार ! – उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

वेंगुर्ले – सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जिल्हा बँकेच्या) निवडणुकीसह जिल्ह्यात आगामी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसह अन्य सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी सत्तेत आहे. या आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीची बैठक ८ ऑक्टोबरला वेंगुर्ले येथे फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘‘समन्वय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकासात्मक कामे आणि जिल्हा बँकेची आगामी निवडणूक यांविषयी चर्चा झाली. या निवडणुकीतील जागावाटपाविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच आघाडीची बैठक होऊन वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे जागावाटपाचा निर्णय घेण्यात येईल.’’ या बैठकीला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.