बांदा येथे अनुमतीहून अधिक खडीची वाहतूक करणार्‍या ७ डंपरवर महसूल विभागाची कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात खडीची वाहतूक करतांना अनुमतीहून अधिक (ओव्हरलोड) खडीची वाहतूक करणार्‍या ७ डंपरवर बांदा येथे महसूल विभागाच्या पथकाने कारवाई केली. ‘ओव्हरलोड’ वाहतुकीविषयी आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. (‘ओव्हरलोड’ वाहतुकीविषयी तक्रार आली नसती, तर ही वाहतूक अशीच चालू राहिली असती, असे समजायचे का ? कि ‘तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी प्रशासनाची मानसिकता झाली आहे ? – संपादक)

सटमटवाडी, बांदा येथे मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या पथकर नाक्यावर (टोलनाका) नायब तहसीलदार मनोज मुसळे, महसूल विभागाचे मंडल अधिकारी आर्.वाय. राणे आणि बांद्याच्या तलाठी वर्षा नाडकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कारवाई करण्यात आलेल्या डंपरच्या चालकांकडे २ ब्रास (१ ब्रास = अनुमाने ४२०० किलो) खडीची वाहतूक करण्याची अनुज्ञप्ती होती; मात्र महसूल विभागाच्या पथकाने केलेल्या तपासणीत डंपरमध्ये ४ ब्रास खडी असल्याचे उघड झाले. कह्यात घेतलेले डंपर पुढील कारवाईसाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात नेण्यात आले.