अमरावती, ८ ऑक्टोबर (वार्ता.) – हिंदूसंघटन ही सध्याच्या काळाची आवश्यकता असून खरा मानवताधर्म स्थापन करण्याची संजीवनी बुटी म्हणजे सनातन संस्थेचे ‘ग्रंथ प्रसार अभियान’ आहे, असे गौरवोद्गार येथील पू. सचिनदेव महाराज यांनी काढले. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या संकल्पशक्तीने युक्त ‘ज्ञानशक्ती प्रसार’ अभियानाचा नुकताच प्रारंभ झालेला आहे. या अभियानाच्या निमित्ताने संत श्री अच्युत महाराज यांचे उत्तराधिकारी पू. सचिनदेव महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे आणि श्री. कपिल देव यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी त्यांची भेट घेतली. त्या वेळी पू. महाराज बोलत होते. सनातन संस्थेच्या ग्रंथसंपदेविषयीचे माहितीपुस्तकही त्यांना देण्यात आले.
या वेळी पू. महाराजांनी अभियानाचे कौतुक करतांना म्हटले, ‘‘हिंदु मनाला जागृत करणे, हा प्रमुख उद्देश या अभियानाद्वारे साधला जात आहे. पहाण्याचा दृष्टीकोन जरी वैज्ञानिक असला, तरी आंतरिक वृत्ती मात्र आध्यात्मिक असल्याने हे अभियान परिपूर्ण अवस्थेला पोचू शकेल. ८२ लाखांहून अधिक प्रती, तसेच ३४५ ग्रंथ समाजात पोचवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देऊन सत्यज्ञानाचा महाप्रसादच समाजापर्यंत पोचवला आहे. त्यांचे विचार घरोघरी जावोत आणि ‘मानवताधर्म’ हिंदुत्वाच्या माध्यमातून अबाधित राहो, अशाच साहित्यसेवेचा प्रसार सद्गुरूंनी सर्व साधकांकडून करून घ्यावा’, अशी त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना आहे. अशा प्रकारे त्यांनी अभियानाचे कौतुक करत सहृदयाने भरभरून आशीर्वाद दिले. या वेळी त्यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देण्यात आले.