प्रियांका वाड्रा नवरात्रीचे व्रत करणार ! – काँग्रेसने दिली माहिती

राहुल गांधी यांनी यापूर्वी झालेल्या निवडणुकांच्या वेळी मंदिरांत जाऊन पूजाअर्चा करूनही हिंदूंनी त्यांना महत्त्व दिले नाही; कारण हे त्यांचे ढोंग होते, हे हिंदूंनी जाणले. तोच प्रकार उत्तरप्रदेशमधील निवडणुकीच्या तोंडावर आता प्रियांका वाड्रा करू पहात आहेत. असे करण्यापेक्षा काँग्रेसने हिंदुहितासाठी प्रथमपासून प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते किंबहुना आता जरी करण्याचा प्रयत्न केला, तरी पक्षाला थोडेतरी चांगले दिवस येतील ! – संपादक

नवी देहली – काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यावर्षी नवरात्रीचेे व्रत करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसने सामाजिक माध्यमांद्वारे दिली. यावर सामाजिक माध्यमांवरून वाड्रा यांच्यावर उपरोधिक टीका करण्यात येत आहे.

आशुतोष झा या सामाजिक माध्यमांवर सक्रीय असणार्‍या व्यक्तीने उपरोधिकपणे लिहिले आहे की, या व्रताच्या वेळी प्रियांका वाड्रा निर्जला पद्धतीने हे व्रत करणार कि त्या फलाहार करणार ? जर फलाहार करणार असतील, तर कोणते फळ खाणार ? किती खाणार ? कापलेले खाणार कि थेट खाणार आणि किती वेळा चावून खाणार ? ही सर्व माहिती त्यांनी सांगितली पाहिजे; कारण प्रसारमाध्यमांना यामध्येच अधिक रस असतो. यासह लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्येही प्रश्‍न विचारण्यात येईल.