हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ? – सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश पोलिसांना फटकारले

उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराचे प्रकरण

नवी देहली – हत्येच्या प्रकरणातील आरोपीला पोलीस नोटीस पाठवून बोलावतात का ?, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणी न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीच्या वेळी पोलिसांना फटकारले. ‘आतापर्यंत तुम्ही हत्येच्या प्रकरणातील आरोपींना कशाच्या आधारे कह्यात घेतले नाही ?’ असा प्रश्‍नही न्यायालयाने विचारला.

न्यायालयाने म्हटले की, या हिंसाचारात ८ जणांची हत्या करण्यात आली आहे. सर्व आरोपींसाठी कायदा समान आहे. आम्हाला आशा आहे की, राज्य सरकार या प्रकरणी गंभीर असून आवश्यक पावले उचलील. या प्रकरणाची चौकशी पर्यायी अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात यावी. जोपर्यंत ही यंत्रणा अन्वेषण चालू करत नाही, तोपर्यंत अन्वेषणाचे दायित्व राज्याचे पोलीस महासंचालकांचे असेल. या प्रकरणातील सर्व पुरावे सुरक्षित ठेवण्यात यावेत.