अर्थतज्ञांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मराठवाड्यात आलेल्या पुराचे दायित्व कोण घेणार ? तसेच पुरामुळे झालेली हानी कोण भरून देणार ? नागरिकांना झालेला मनस्ताप कोणत्याही गोष्टीने भरून निघणार नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ?
संभाजीनगर – ‘गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे; मात्र ही स्थिती ‘जलयुक्त शिवार योजने’मुळे निर्माण झाली आहे’, असा आरोप ज्येष्ठ अर्थतज्ञ एच्.एम्. देसरडा यांनी केला आहे, तर भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी ‘देसरडा यांच्या आरोपात तथ्य नाही’, असे स्पष्टीकरण दिले आहे.
अर्थतज्ञ देसरडा पुढे म्हणाले की,
१. युती सरकारच्या काळात ‘जलयुक्त शिवार योजने’ची कामे करतांना नैसर्गिक प्रवाह नष्ट करण्यात आले होते. ‘पोकलेन आणि जेसीबी’ (भूमी उकरून खोल खड्डा करणारे यंत्र) लावून नदीचा नैसर्गिक प्रवाह नष्ट करण्यात आला आहे.
२. कुठे अतीखोल, तर कुठे रुंद खोदकाम झाल्याने शेतीची हानी झाली आहे. पाण्याचा प्रवाह अडवतांना शास्त्रशुद्धपणे न केल्याने पाण्याचा प्रलय झाला आहे.
३. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जलयुक्त शिवार योजना जलसंधारणाची असली, तरी ती चुकीच्या पद्धतीने केली जात आहे’, असे मी त्यांना सांगितले होते.
४. एकाच गावात अनेक बंधारे बांधून चुकीच्या पद्धतीने पाणी अडवण्याचे काम केले जात आहे. पाणी अडवल्याने भूमी वाहून गेल्याने शेतकर्यांची हानी झाली आहे. किती भूमी वाहून गेली याचे गणित मांडणे अवघड आहे; मात्र योजना चुकीच्या पद्धतीने राबवल्याने आज मराठवाड्यात महाप्रलय आला आहे.
तांत्रिक गोष्टी पडताळून काम केले ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, नेत्या, भाजप
याविषयी भाजपच्या नेत्या सौ. पंकजा मुंडे-पालवे म्हणाल्या की, ‘जलयुक्त शिवार योजने’त कुठलेही चुकीचे काम झालेले नाही. काम करत असतांना तांत्रिक गोष्टी पडताळून काम केले आहे. नदी किंवा तलाव यांचा प्रवाह पालटला नाही. त्यामुळे कुणी आरोप करत असेल, तर ते चुकीचे आहे.