शक्तिदेवता !

ज्योतिर्मय स्वरूप असलेली ब्रह्मचारिणीदेवी

नवरात्रीनिमित्त प्रतिदिन वाचा विशेष सदर…

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत.

नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय ! सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेणार आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया.

विशेष सदराचा मागील भाग पहाण्यासाठी येथ क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/516942.html

आश्विन शुक्ल पक्ष द्वितीया, ८.१०.२०२१

२. नवरात्रीच्या दुसर्‍या दिवशी प्रकट होणारे आदिशक्तीचे रूप ‘ब्रह्मचारिणी’ !

२ अ. ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी देवी सतीने केलेली अतिशय कठीण तपश्चर्या ! : ‘ब्रह्मचारिणी’ हे देवी सतीचे अविवाहित रूप आहे. ‘ब्रह्मचारिणी’ या नावामधील ‘ब्रह्म’ म्हणजे ‘शुद्ध आत्मतत्त्व’ आणि ‘ब्रह्मचारिणी’, म्हणजे आत्मतत्त्वाच्या उपासनेत सतत रत (मग्न) असलेली. पार्वतीने ‘शिव पती म्हणून लाभावा’, यासाठी महर्षि नारद यांच्या सांगण्यावरून सहस्रो वर्षे कठीण तपश्चर्या केली. शेवटची काही सहस्र वर्षे ती केवळ बिल्व पानांच्या (बेलाच्या पानांच्या) आहारावर राहिली आणि शेवटी तिने बिल्वपाने खायचेही सोडून दिले. तेव्हा तिला ‘अपर्णा’ असे नाव पडले. ‘पर्ण’ म्हणजे ‘पान’ आणि ‘अपर्णा’, म्हणजे ‘व्रतपालन करतांना जिने पानांच्या सेवनाचाही त्याग केला ती.’ ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप ज्योतिर्मय आणि भव्य आहे. देवीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ब्रह्मदेवाने आकाशवाणीच्या माध्यमातून सांगितले, ‘देवी, आजपर्यंत तुझ्यासारखी एकनिष्ठेने कुणीही साधना केली नाही. तुला साक्षात् शिवशंकर पतीरूपात लाभणार आहे.’ देवीने जगासमोर ईश्वरप्राप्तीसाठी अखंड साधना करून अविरत साधनेचा अत्युत्तम आदर्श ठेवला आहे.

श्री. विनायक शानभाग

२ आ. प्रार्थना : ‘हे देवी ब्रह्मचारिणी, तू आम्हा साधकांना तुझ्यासारखी साधनापथाशी एकनिष्ठ रहाण्याची शक्ती दे आणि या साधनामार्गापासून दूर न जाण्याचा आशीर्वाद दे.

‘हे देवी, आम्ही साधक श्री गुरुचरणांच्या प्राप्तीसाठी तळमळत आहोत. साधनापथामध्ये येणारे सर्व अडथळे आणि संघर्ष यांवर आम्हाला मात करता येऊ दे अन् स्थिर राहून आणि संयम ठेवून श्री गुरुचरणांची सेवा करता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आई, आमचे नामस्मरण अखंड होऊ दे. आम्हाला सदैव गुरुचरणांचा ध्यास लागू दे. ‘हे जगन्माते, तू आम्हा साधकांकडून गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना करवून घे’, अशी प्रार्थना आहे. तुझ्या चरणी कोटीशः वंदन !’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान (१६.०९.२०२१)