शक्तिदेवता !

नवरात्रीनिमित्त प्रतिदिन वाचा विशेष सदर…

‘युगानुयुगे नवरात्रीचे व्रत करण्यात येते. या ९ दिवसांत देवीच्या ९ रूपांची पूजा करण्यात येते. या वर्षी नवरात्रीच्या निमित्ताने आपण या देवीच्या ९ रूपांचा महिमा जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे व्रत म्हणजे आदिशक्तीची उपासना होय !

सनातन संस्थेचे साधक गेली अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातनच्या साधकांकडून आरंभी आदिशक्तीची उपासना करवून घेतली आहे. त्याविषयी प्रतिदिन आपण जाणून घेणार आहोत. कालमाहात्म्यानुसार आपण हिंदु राष्ट्राची वाट बघत वैश्विक युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जगज्जननी आदिशक्ति लयकारीही आहे. ‘ती हिंदु राष्ट्र कसे घडवून आणणार आहे ?’, हे आपण या नवरात्रीच्या काळात जाणून घेऊया. आपण आदिशक्तीला भावभक्तीने आळवूया आणि तिची कृपा संपादन करूया.

देवीच्या ९ रूपांविषयी… !

प्रथमं शैलपुत्रीति द्वितीयं ब्रह्मचारिणी ।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।। ३ ।।

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च ।
सप्तमं कालरात्रिश्च महागौरीति चाष्टमम् ।। ४ ।।

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।। ५ ।।

– देवीकवच

अर्थ : पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघण्टा, चौथी कुष्माण्डा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि नववी सिद्धिदात्री अशी ही नऊ दुर्गांची नावे साक्षात् ब्रह्मदेवाने सांगितली आहेत.

नवरात्रीतील ९ दिवस देवीच्या वरील ९ रूपांची पूजा केली जाते. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आज आपण शैलपुत्री या देवीच्या प्रथम रूपाविषयी जाणून घेऊया.

आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा, घटस्थापना, ७.१०.२०२१

१. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्ति देवीचे प्रकट होणारे शैलपुत्री रूप !

वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम् ।
वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ।।

अर्थ : ‘मस्तकावर अर्धचंद्र धारण करणार्‍या, वृषभारूढ, त्रिशूलधारी, वैभवशाली अशा शैलपुत्री देवीला इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी’, यासाठी मी वंदन करतो.

वृषभावर आरूढ असलेल्या शैलपुत्रीदेवीचे सुंदर रूप

१ अ. शैलपुत्री, म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या असल्यामुळे तिला ‘शैलपुत्री’, असे संबोधले जाणे, सर्व देवतांच्या अहंकाराचेही हरण करणार्‍या शैलपुत्रीला ‘हैमावती’, असेही संबोधत असणे : भक्तांचे मनोवांछित पूर्ण करणारी, चंद्रालंकार धारण करणारी, वृषभारूढ, त्रिशूळधारी आणि यश प्राप्त करवून देणार्‍या शैलपुत्री देवीच्या चरणी कोटी कोटी वंदन ! ‘शैल’ म्हणजे पर्वत. दक्षाने केलेल्या यागाच्या वेळी दक्षपुत्री देवी सती तिचे ‘आदिशक्ति’ हे’ स्वरूप प्रकट करून तिचा अवतार संपवते. त्यानंतर आदिशक्ति पर्वतराज हिमालयाची पुत्री म्हणून जन्माला येते. तिचे हे रूप ‘शैलपुत्री’ या नावाने पूजले जाते. या रूपात देवी वृषभावर आरूढ आहे. तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसर्‍या हातात कमळ आहे. शैलपुत्री पार्वतीला ‘हैमावती’ असेही म्हणतात. एकदा देवतांनाही अहंकार झाला होता. त्या वेळी देवी शैलपुत्रीने त्यांचे गर्वहरण करून त्यांचा अहंकार नाहीसा केला होता.

१ आ. प्रार्थना : ‘हे देवी शैलपुत्री, ज्याप्रमाणे तू हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेऊन एकनिष्ठेने आई-वडिलांची सेवा केलीस आणि शंकराची अनन्य भक्ती केलीस, त्याचप्रमाणे आम्हा साधकांना गुरुसेवा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सेवा) करण्यासाठी अन् गुरुदेवांची अनन्य भक्ती करण्यासाठी आशीर्वाद दे. हे देवी हैमावती, ज्याप्रमाणे तू देवतांचा अहंकार नाहीसा केलास, त्याचप्रमाणे तू आमचा अहंकार नष्ट कर. आमच्याकडून ‘अहं’विरहित गुरुसेवा होण्यासाठी तूच आमच्याकडून ‘अहं’निर्मूलनासाठी साधना करवून घे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१६.९.२०२१)


परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेच्या आरंभी कुलदेवतेची उपासना करण्यास सांगून त्यांच्याकडून आदिशक्तीची उपासना करवून घेणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधक साधना करू लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रथम साधकांना त्यांच्या त्यांच्या कुलदेवीची उपासना करायला सांगितली आणि सर्व साधकांकडून त्यांच्या कुलदेवीचे नामस्मरण करवून घेतले. कुलदेवीची उपासना, म्हणजेच आदिशक्तीची उपासना आहे ! साधनेतील प्राथमिक अवस्थेत गुरुदेवांनी आम्हा साधकांकडून ‘कुलदेवीची उपासना, नामस्मरण आणि कुलाचार पालन’, असे सर्व करवून घेतले. देवी आदिशक्तीनेही साधकांना भरभरून दिले. साधकांच्या साधनेतील प्राथमिक टप्प्याचे सर्व अडथळे देवीनेच दूर केले. आम्हा साधकांकडून आदिशक्तीची उपासना करवून घेणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ।।

– तन्त्रोक्त देवीसूक्त, श्लोक ६

अर्थ : सर्व जिवांमध्ये जी ‘विष्णुमाया’ या रूपाने ओळखली जाते, त्या देवीला त्रिवार नमस्कार असो.’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान (१६.९.२०२१)


भगवान शिवाची शक्ति म्हणजेच ‘आदिशक्ति’ !

‘आदिशक्ति कोण आहे ?’, हे जाणून घ्यायचे असेल, तर स्वामी भोलेबाबाजी (उत्तर भारतातील एक संत) यांनी सांगितलेली कथा अत्यंत बोधप्रद आहे. आदिशक्तीविषयी अनेक ग्रंथ वाचूनही आपल्या जे लक्षात येणार नाही, ते केवळ या एका प्रसंगातून लक्षात येईल.

श्री. विनायक शानभाग

१. शाक्तमताचे खंडण करण्याचा प्रयत्न करणार्‍या आद्यशंकराचार्यांना देवीने ते खंडण करू शकत नसल्याची जाणीव करून देणे

१ अ. शाक्तमताचे खंडण करण्यासाठी काश्मीर येथे गेलेल्या आद्यशंकराचार्यांना दमल्यामुळे बोलण्याचीही शक्ती नसणे : स्वामी भोलेबाबाजींनी सांगितले, ‘‘एकदा भगवत्पाद आद्यशंकराचार्य ‘शाक्तमता’चे खंडण करण्यासाठी काश्मीर येथे गेले होते. ‘शाक्तमता’पेक्षा ‘अद्वैत सिद्धांत’ कसा श्रेष्ठ आहे ?’, असा विषय ते तिथे मांडणार होते; पण काश्मीरला पोचेपर्यंत ते पुष्कळ दमले. ते इतके दमले होते की, त्यांना उठणे, बसणे आणि बोलणे यांसाठीही शक्ती नव्हती.

१ आ. एका बालिकेच्या रूपात आलेल्या देवीने शंकराचार्यांना ‘तुम्ही शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताचे मंडण करू शकता का ?’, असे विचारणे : थोड्या वेळाने दैवी सौंदर्य असलेली एक १२ वर्षांची कन्या त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या कानात म्हणाली, ‘हे शंकर, तुम्ही शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताचे मंडण करू शकता का ?’ अगदी लहान आवाजात आद्यशंकराचार्य तिला म्हणाले, ‘देवी, यासाठीच मी काश्मीरला आलो आहे; मात्र आता माझ्यात बोलण्याचीही शक्ती नाही. जेव्हा माझ्या अंगात शक्ती येईल, तेव्हाच मी याविषयी काही बोलू शकेन. माझ्यात शक्ती आल्याविना मी काही करू शकत नाही.’

१ इ. देवीने ‘शक्तीविना शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताची मांडणी कशी करू शकता ?’, असे विचारल्यावर आद्यशंकराचार्य आनंदाने देवीच्या चरणी नतमस्तक होऊन तिथून निघून जाणे : तेव्हा ती दैवी कन्या स्मितहास्य करत त्यांना म्हणाली, ‘हे विद्वोत्तम, तुमच्यात शक्तीच नाही, तर तुम्ही शाक्तमताचे खंडण आणि अद्वैत सिद्धांताचे मंडण कसे करू शकता ? मी शिवाची शक्ति ‘शिवा’ आहे. शिव अचल आहे, शक्तिविना शिवाकडून कुठलीही क्रिया होऊ शकत नाही. शिवाला जाणण्यासाठी आणि ‘शिव कोण आहे ?’, हे इतरांना कळण्यासाठी शिवानेच शक्तीची उत्पत्ती केली आहे. हे शंकर, माझी उत्पत्ती शिवापासूनच झाली असल्याने तुम्ही माझे खंडण कसे करू शकता ? ‘खंडण असो किंवा मंडण असो’, ते मीच करू शकते. ज्या शक्तीविना तुम्ही काही करू शकत नाही, त्याचे खंडण तुम्ही करूच शकत नाही.’ देवीचे हे बोल ऐकून शंकराचार्यांना अत्यंत आनंद झाला. त्यांनी देवीचे चरण धरले आणि तत्क्षणी ते काश्मीरमधून परत आले.’

२. ‘आदिशक्ति’ ही सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपिणी असून तिला शरण जाऊन भक्तीभावाने तिची नित्यउपासना करणे’, एवढेच आपण करू शकणे

स्वामी भोलेबाबाजी सांगतात, ‘‘शक्ति कोण आहे ? कुठून आली ? तिची निर्मिती कुणी केली ? कुणासाठी केली ? कशासाठी केली ? कुठे केली ? कधी केली ?’, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे व्यर्थ आहे. ‘शक्ति अनादी काळापासून आहे आणि अनंत काळापर्यंत असणारच आहे’, हेच एकमेव सत्य आहे. विश्वाच्या उत्पत्तीपासून जी काही क्रिया घडत आली आहे, त्यामध्ये तीच आहे ! अशी ती आदिशक्ति सच्चिदानंद परब्रह्मस्वरूपिणी आहे. तिला शरण जाऊन भक्तीभावाने तिची नित्यउपासना करणे’, एवढेच आपण करू शकतो.’’

३. शक्तिविना शिव कार्य करू शकत नाही, त्याचप्रमाणे गुरुकृपेविना साधक काहीच करू शकत नसणे, केवळ श्री गुरूंच्या चैतन्यशक्तीच्या माध्यमातूनच कार्य होत असणे

सनातनच्या साधकांच्या साधनेचेही असेच आहे. सनातनच्या तीन गुरूंची, म्हणजे ‘सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची कृपा असणे’, हीच सनातनच्या साधकांची शक्ती आहे. गुरुकृपेविना साधक काहीच करू शकत नाहीत. गुरुकृपारूपी शक्तीच साधकांकडून सर्वकाही करवून घेते. ‘गुरुकृपा’ काय आहे ?’, याचे आपण कुणीही वर्णन करू शकत नाही. ‘ती ‘गुरुकृपा’रूपी शक्ती सर्व साधकांच्या माध्यमातून कार्य करवून घेत आहे’, हे सत्यवचन आहे ! ‘गुरुकृपारूपी शक्ती प्राप्त होण्याआधी आपली काय स्थिती होती ?’, ते साधकांनी काही प्रमाणात अनुभवलेले आहे.

सनातनच्या साधकांमध्ये ‘चैतन्यशक्तीच्या’ रूपात अखंड विराजमान असलेल्या सनातनच्या तिन्ही गुरूंच्या चरणी त्रिवार वंदन !’

– श्री. विनायक शानभाग, जयपूर, राजस्थान. (१६.०९.२०२१)