प्रेमळ, उत्साहाने सतत सेवा करणार्‍या आणि रामनाथी आश्रमातील साधकांसाठी जणू ‘अन्नपूर्णामाता’ बनलेल्या सनातनच्या ६० व्या संत पू. (कु.) रेखा काणकोणकर (वय ४४ वर्षे) !

आज आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (७.१०.२०२१) या दिवशी पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने…

आज, आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा (घटस्थापना, ७.१०.२०२१) या दिवशी रामनाथी, गोवा येथील अन्नपूर्णा कक्षात सेवा करणार्‍या पू. (कु.) रेखा काणकोणकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त रामनाथी आश्रमातील साधिका सौ. रूपाली पाटील यांना पू. रेखाताईंच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. (कु.) रेखा काणकोणकर

पू. (कु.) रेखा काणकोणकर यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. आनंदी आणि हसतमुख राहून उत्साहाने सेवा करणार्‍या पू. रेखाताई !

‘पू. रेखाताई म्हणजे रामनाथी आश्रमातील साक्षात् अन्नपूर्णामाताच ! गेल्या तीन वर्षांपासून मी स्वयंपाकघरात सेवा करत आहे. मला पू. रेखाताईंकडून पुष्कळ काही शिकायला मिळाले. त्या सतत आनंदी आणि हसतमुख असतात. पू. ताई सतत सेवा करत असतात; परंतु ‘त्या दमल्या आहेत किंवा त्यांना कंटाळा आला आहे’, असे कधीच दिसत नाही. त्यांच्या तोंडवळ्यावर कधी थकवा जाणवत नाही.

२. पू. रेखाताईंच्या सहवासात प्रसन्न वाटून साधकांना थकवा न येणे

पू. ताई स्वयंपाकघरात आल्यावर आम्हाला पुष्कळ प्रसन्न वाटते आणि सेवेचा आनंद घेता येतो. त्यांच्याकडून मिळत असलेल्या चैतन्याने आम्हाला त्यांच्या समवेत सेवा करायला कंटाळा येत नाही किंवा कधी दमल्यासारखे वाटत नाही. जेव्हा पू. ताई आम्हाला हाक मारतात, तेव्हा आम्हाला पुष्कळ आनंद होतो.

३. पू. रेखाताईंची साधकांवरील प्रीती !

पू. ताई सर्व साधकांवर पुष्कळ प्रेम करतात. त्यांचे सर्वांवर एकसारखे प्रेम आहे. त्या आम्हा सर्वांची काळजी घेतात.

सौ. रूपाली पाटील

४. पू. रेखाताईंनी साधकांना सेवांमधील बारकावे शिकवून त्यांना परिपूर्णतेकडे नेणे

स्वयंपाकघरात सेवा करतांना पू. ताईंनी आम्हाला सेवांमधील बारकावे शिकवले आहेत. ‘बारकावे समजून घेऊन सेवा केल्यास ‘साधकांची प्रगती शीघ्र गतीने कशी होऊ शकेल’, हे त्या आम्हाला समजावून सांगतात. प्रत्येक प्रसंगात त्या आम्हाला योग्य दृष्टीकोन देऊन शिकवतात. पू. ताई केवळ आम्हाला शिकवतच नाहीत, तर ‘त्यातून आमची साधना होऊन प्रगती कशी होईल ?’, याकडे त्यांचे सतत लक्ष असते.

५. पू. रेखाताईंनी साधकांना सेवेत चुका न होण्यासाठी योग्य दिशा देणे

आम्ही आमच्याकडून झालेल्या चुका पू. ताईंना सांगतो. त्या वेळी ‘त्या प्रसंगात योग्य कसे असायला हवे आणि चूक न होण्यासाठी काय करावे ?’, हे त्या समजावून सांगतात. त्यामुळे आम्हाला कधीही चुकांचा ताण येत नाही.

६. संतपदावर असलेल्या पू. रेखाताईंची अहंशून्यता !

पू. ताई आणि सौ. सुप्रियाताई (सौ. सुप्रिया माथूर) एकमेकींना विचारून ‘स्वयंपाकात कोणता पदार्थ करायचा ?’, हे ठरवतात. यातून ‘पू. ताई संत असूनही त्या विचारून कृती करतात’, हे मला शिकायला मिळाले.

७. अनुभूती

७ अ. साधिकेला स्वप्नात आश्रमातील स्वयंपाकघर दिसून पू. रेखाताईंची हाक ऐकू येणे आणि जाग आल्यावर तिला प्रसन्न वाटणे : एकदा मला एक स्वप्न पडले आणि त्या स्वप्नात आश्रमातील स्वयंपाकघर दिसले. सकाळच्या वेळी स्वयंपाकघरात सेवेची धावपळ असते, तसेच मला स्वप्नातही सर्व दिसले. सेवा करत असतांना पू. ताई आम्हाला जशी हाक मारतात, तशीच पू. ताईंची हाक मला स्वप्नातही ऐकू आली. त्यानंतर मला जाग आली. जाग आल्यावर मला प्रसन्न वाटत होते.

७ आ. पू. रेखाताईंना व्यष्टी साधनेचा आढावा देतांना ‘साक्षात् अन्नपूर्णामातेलाच आढावा देत आहे’, असे साधिकेला जाणवणे : पू. ताई आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतात. त्या वेळी ‘आम्ही साक्षात् अन्नपूर्णामातेलाच आमचा आढावा देत आहोत’, असे मला जाणवते. त्यामुळे आमचा आढावा भावपूर्ण होऊन मला चैतन्य मिळते.

‘मला पू. रेखाताईंच्या सहवासात स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी दिली’, याबद्दल देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. रूपाली पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.९.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक