काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

सुरक्षादलाचे जवान घटनास्थळी

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद अल्प होत असल्याचे सांगितले जात असतांना ५ ऑक्टोबरला आतंकवाद्यांनी दीड घंट्यात केलेल्या ३ वेगवेगळ्या आक्रमणांपैकी २ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य केले, तर एका ठिकाणी एका मुसलमानाला ठार करण्यात आले. पहिल्या घटनेत श्रीनगरमधील एका प्रतिष्ठित औषध दुकानाचे मालक माखनलाल बिंद्रू यांची आतंकवाद्यांनी दुकानात घुसून हत्या केली. ६८ वर्षीय बिंद्रू यांनी वर्ष १९९० च्या हिंदूंवरील आक्रमणांच्या काळात काश्मीर सोडले नव्हते. दुसर्‍या घटनेत अवंतीपोरामध्ये बिहारच्या एका हिंदु व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारले. तिसर्‍या घटनेत बांदीपोरा येथे टॅक्सी युनियनच्या अध्यक्षाला ठार मारण्यात आले. ‘बाहेरील लोकांनी काश्मिरी लोकांचा रोजगार हिरावून घेऊ नये’, अशी चेतावणी आतंकवाद्यांनी दिली आहे.

१. या हत्यांविषयी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी तीव्र दु:ख व्यक्त करून ‘दोषींना कठोर शासन केले जाईल’, असे सांगितले.

२. आतंकवाद्यांनी अवंतीपोरामध्ये बिहारच्या वीरेंद्र पासवान याला ठार केले. वीरेंद्र भेळपुरी आणि पाणीपुरी यांचा गाडा चालवत असे. त्याला गाड्याजवळच मारण्यात आले.

३. या घटनेनंतर काही मिनिटांनी बांदीपोरा येथे स्थानिक टॅक्सी युनियनचे अध्यक्ष महंमद शफी यांची ते टॅक्सी स्टँडकडे पायी जात असतांना आतंकवाद्यांनी त्यांची हत्या केली.