पुणे – महापालिकेच्या नगर रस्ता आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणार्या ७२५ सफाई कर्मचार्यांचे वेतन ४ मासांपासून रखडले आहे. त्यामुळे थकीत वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी महापालिका कामगार युनियनने प्रशासनाकडे केली आहे. नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात ४०० आणि येरवडा क्षेत्रीय कार्यालयात ३२५ कंत्राटी कामगार आहेत. त्यांना जूनपासून वेतन मिळाले नसल्याने कंत्राटदारांच्या विरुद्ध क्षेत्रीय कार्यालयाकडे तक्रार केली आहे. संबंधित ठेकेदारावर पिंपरी-चिंचवड महापालिकेत कारवाई झाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली असल्याने वेतन देण्यात अडथळे येत आहेत. प्रतिमास ८० लाख रुपयांचा पगार दिला जात असल्याने इतकी मोठी रक्कम उपलब्ध होणे शक्य नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वेतन दिले जात आहे. २ मासांचे वेतन दिले असून पुढील १५ दिवसांत उर्वरित २ मासांचे वेतन देणार असल्याचे उपायुक्त संजय गावडे यांनी सांगितले.