क्रोएशिया येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. योसिप स्ट्युपिच यांना वर्ष २०२० च्या पितृपक्षात आलेली अनुभूती

श्री. योसिप स्ट्युपिच

१. वर्ष २०२० च्या पितृपक्षातील एका रात्री साधकाच्या स्वप्नात त्याची मृत आजी येणे

‘वर्ष २०२० च्या पितृपक्षातील एका रात्री माझ्या स्वप्नात बर्‍याच वर्षांपूर्वी मृत पावलेली माझी आजी आली. गेल्या कित्येक वर्षांत माझ्या मनात तिच्याविषयी कोणतेच विचार आले नव्हते आणि तिच्याविषयी काही स्वप्नही पडले नव्हते. या पितृपक्षात हे स्वप्न मला प्रथमच पडले.

२. पितृपक्षात श्राद्धविधी करत असतांना साधकाला सूक्ष्मातून श्री दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवून पूर्वजांना पृथ्वीवरील विविध वस्तूंतील आसक्तीतून मुक्त करणार्‍या दत्तगुरूंच्या प्रती त्याचा भाव जागृत होणे

एस्.एस्.आर्.एफ्.च्या मार्गदर्शनानुसार मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप प्रतिदिन करतो, तसेच या वेळी मी श्राद्धविधी करण्याचाही प्रयत्न केला. श्राद्धविधीच्या वेळी मी श्री दत्तगुरूंना शरण जाऊन भावपूर्ण नमस्कार केला. प्रार्थना करत असतांना मी त्यांचे अस्तित्व अनुभवण्याचा आणि त्यांना सूक्ष्मातून पहाण्याचाही प्रयत्न केला. त्या वेळी मला सूक्ष्मातून दत्तगुरूंचे अस्तित्व जाणवले, तसेच ‘पक्ष्यांना अर्पण केलेले अन्न पक्ष्यांंनी सूक्ष्मातून येऊन ग्रहण केले’, असेही मला जाणवले. सत्याचे ज्ञान देणार्‍या आणि पूर्वजांना पृथ्वीवरील त्यांच्या वस्तूंतील आसक्तीतून मुक्त करणार्‍या श्री दत्तगुरूंच्या प्रती माझा भाव दृढ झाला.

३. मृत नातेवाइकांचा त्यांच्या पूर्वायुष्याशी असलेला बंध न्यून होण्यासाठी साधकाने घरात असलेली त्यांची छायाचित्रे जाळणे

मी आणखी एक प्रयत्न करायचे ठरवले. मला आठवले की, आमच्याकडे कुटुंबातील व्यक्तींच्या छायाचित्रांचा एक जुना संग्रह आहे. त्यात माझे आजी-आजोबा आणि इतर काही नातेवाईक यांची छायाचित्रे आहेत. मी ती सर्व छायाचित्रे अग्नीत विसर्जन करायचे ठरवले, जेणेकरून या सर्वांचा त्यांच्या पूर्वायुष्याशी असलेला बंध न्यून होईल !

३ अ. मृत नातेवाइकांची छायाचित्रे अग्नीत विसर्जन करतांना त्यातील व्यक्तींचे निरीक्षण करणे आणि एका छायाचित्रात आध्यात्मिक प्रवासाच्या वाटेवर असलेल्या आजीचा लिंगदेह दिसणे : मी अंगणात अग्नी पेटवला आणि त्यात पूर्वजांचे एक एक छायाचित्र विसर्जित करू लागलो. माझे डोळे छायाचित्रांतील त्या व्यक्तींना पहात होते. एका छायाचित्रात मी माझ्या आजीला पाहिले. मी तिला निरखून पाहिल्यावर मला तिची आकृती स्पष्टपणे दिसू लागली. त्या आकृतीत मला तिचा लिंगदेहही दिसला. तो लिंगदेह माझ्या आणि इतरांच्या लिंगदेहाप्रमाणे आध्यात्मिक प्रवासाच्या वाटेवर (ईश्वराकडे जाण्याच्या मार्गावर) होता. आजीचा लिंगदेह पुष्कळ तेजस्वी दिसत होता.

३ आ. आजीचे छायाचित्र अग्नीत विसर्जित केल्यावर ‘आजी वारल्यावर तुला तिची आठवण येईल का ?’, या तिच्या प्रश्नाचे स्मरण होणे आणि ‘पूर्वजांना गती मिळण्यासाठी करावयाचे प्रयत्न, हीच त्यांची खरी आठवण आहे’, हे लक्षात येणे : आजीचे छायाचित्र अग्नीत विसर्जित केल्यावर मला एक घटना आठवली. काही वर्षांपूर्वी मी आणि आजी एका लाकडी बाकावर बसलो होतो. ती मला सहजच म्हणाली, ‘‘ही म्हातारी आजी वारल्यावर तुला तिची आठवण येईल का ?’’ हा प्रसंग आठवल्यावर माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. माझ्या मनात विचार आला, ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप, प्रार्थना, तसेच श्राद्धविधी करणे, यांमुळेच पूर्वजांना पुढची गती मिळते. आजची छायाचित्रे जाळण्याची कृती हासुद्धा पूर्वजांना गती मिळण्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्या वेळी ‘आध्यात्मिकदृष्ट्या काढलेली पूर्वजांची आठवण, हीच खरी आठवण असून ‘हेच आजीच्या प्रश्नाचे उत्तर आहे’, असे मला वाटले.

त्या वेळी ‘आपल्या पूर्वजांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या योग्य कृती करणे किती महत्त्वाचे आहे’, हे माझ्या लक्षात आले. या कृतीतूनच आपली त्यांच्याविषयी असलेली आसक्ती न्यून होण्यास, तसेच त्यांना पुढची गती मिळण्यास साहाय्य होते.

मला ही अनुभूती दिली आणि त्यातून शिकण्याची संधी दिली, त्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता !’

– श्री. योसिप स्ट्युपिच, क्रोएशिया (८.९.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक