संभाजीनगर येथील १२ वर्षांच्या मुलाला भ्रमणभाषसंच हातात दिल्याविना झोपच येत नाही !

पोलिसांनी समजावले, पालक हतबल !

ऑनलाईन शिक्षणाचा दुष्परिणाम ! – संपादक

भ्रमणभाषच्या अतीवापरामुळे होणारे दुष्पपरिणाम पहाता पालकांनी मुलांचा अभ्यास झाल्यानंतर लगेचच भ्रमणभाष काढून घेणे अपेक्षित आहे. मुलांवर लहानपणापासूनच चांगले संस्कार केल्यास त्यांना योग्य-अयोग्य समजावणे सोपे जाणार, हे पालकांनी या उदाहरणातून शिकावे. – संपादक

संभाजीनगर – शहरातील बीड बायपास परिसरात रहाणार्‍या एका १२ वर्षांच्या मुलाला भ्रमणभाषसंच हातात दिल्याविना झोपच येत नाही. ही सवय मोडण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी अनेक प्रयत्न केले; पण अजून त्यांना यावर उपाय सापडलेला नाही. गेल्या दीड वर्षापासून ‘ऑनलाईन’ शिक्षण चालू झाल्यापासून त्या मुलाला ही सवय लागली आहे.

आईवडिलांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, या मुलाला २४ घंटे हातात भ्रमणभाषसंच लागतो, तरच तो शांत बसतो. अन्यथा चिडचिड करून रडतो. हातात येईल त्या वस्तूने समोरच्या व्यक्तीला मारतो.
मुलाच्या आईने पोलिसांच्या ‘दामिनी पथका’ला (समाजातील महिलांचे संरक्षण आणि कुटुंबांतील समस्या सोडवण्यासाठी गृहखात्याने निर्माण केलेले पथक) दूरभाष करून गार्‍हाणे सांगितले. त्यानुसार दामिनी पथकातील पोलीस अधिकार्‍यांनी मुलाची समजूत काढली. त्याला विश्वासात घेऊन भ्रमणभाषचे धोकेही समजावून सांगितले; मात्र त्यात कितपत सुधारणा होईल, याविषयी पोलिसांनाही शंका आहे.