तक्रारदारावर दबाव आणणारे पोलीस कधी सामान्यांना आधार वाटू शकतील का ?
पुणे, ४ ऑक्टोबर – तक्रारदारावर दबाव आणल्याचा ठपका ठेवत पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि कर्मचारी ज्ञानेश्वर पालवे यांना निलंबित करण्यात आले. सोनवणे हे पोलीस नियंत्रण कक्षात, तर पालवे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात काम करत होते. डॉ. जालंदर सुपेकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त (प्रशासन) यांनी निलंबनाच्या आदेशात स्पष्ट केले की, पुणे पोलिसांकडे आलेल्या एका तक्रारीविषयी चौकशी करण्यात आली. त्या वेळी दोन्ही पोलिसांनी गुन्हेगारी स्वरूपाचे प्रयत्न केल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले. तसेच संबंधित तक्रारदारावर दबाव आणणे आणि अन्य गंभीर गोष्टी समोर आल्या. त्यानुसार दोघांची खात्यांतर्गत चौकशी चालू करून त्यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.