पणजी, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (‘एन्.सी.बी.’ ने) २ ऑक्टोबर या दिवशी मुंबई ते गोवा प्रवासी जहाजावर छापा टाकून उच्चभ्रू लोकांचा सहभाग असलेल्या पार्टीवर कारवाई केली. यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या श्यामा महंमद यांनी ‘मुंद्रा (गुजरात) बंदरावरील अमली पदार्थांच्या विरोधातील कारवाईचे इतरत्र लक्ष वेधण्यासाठी ‘एन्.सी.बी.’ने मुंबईहून गोव्याला जाणार्या जहाजावर छापा टाकला’, असा आरोप केला. प्रवक्त्या श्यामा महंमद ३ ऑक्टोबर या दिवशी येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
श्यामा महंमद पुढे म्हणाल्या, ‘‘मुंबई ते गोवा जहाजावरील धाडीमध्ये ‘बॉलिवूड’अभिनेत्याचा मुलगा असल्याचे वृत्त आहे. ‘एन्.सी.बी.’ अचानकपणे जहाजावरून अमली पदार्थ कह्यात घेतल्याचे सांगत आहे. मुख्य सूत्रावरून लक्ष इतरत्र वेधण्याचा हा प्रकार आहे. मुंद्रा बंदर हे अमली पदार्थ व्यवहाराचे मुख्य ठिकाण आहे आणि येथे अफगाणिस्तान येथून अमली पदार्थांची तस्करी होत असते. यातील पैसे आतंकवादी कारवाया, देशविघातक गट आणि देशात राजकीय अस्थिरता निर्माण करणे यांसाठी वापरले जातात. पत्रकारांनी मुंद्रा बंदरावर काय चालते ? याविषयी लिहायला पाहिजे. मुंद्रा बंदरावर अमली पदार्थ पकडण्यात आले आहेत आणि या प्रकरणाच्या अन्वेषणावर सर्वाेच्च न्यायालयाने देखरेख ठेवावी. गुजरातमधील मुंद्रा बंदरावरील प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गप्प का आहेत ? गुजरात हे अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनत आहे. बंदरांचे खासगीकरण केल्याने अशा प्रकारांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.’’