|
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील अतिरिक्त पोलीस निरीक्षक अजय कुमार याने वरिष्ठ अधिकार्यांच्या अनुमतीविना कुलुप बनवणार्या व्यापार्याच्या आस्थापनावर धाड टाकून त्याचे अपहरण केले. तसेच त्याला मारहाणही केली. त्याच्या तोंडामध्ये पिस्तुल घालून त्याला धमकावले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यावर अजय कुमार याला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
अलीगड येथील अभिषेक तिवारी यांच्या विरोधात १६ सप्टेंबरला राजीव कुमार नावाच्या व्यक्तीने बुलंदशहर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ६ लाख ६० सहस्र रुपयांचा धनादेश न वटल्याचा (‘चेक बाऊन्स’चा) गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्यांच्या अनुमतीविना अतिरिक्त पोलीस निरीक्षक अजय कुमार अलीगड येथे तिवारी यांना अटक करण्यासाठी गेला होता. धनादेश न वटल्यास पोलीस अटक करू शकत नाहीत, तरीही अजय कुमार अटकेसाठी गेला होता.