कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

सर्वच वाचकांना स्वतःच्या पाल्यांवर संस्कार कसे करावेत ? हे कळण्यासाठी उपयुक्त असलेली लेखमालिका !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबर २०२१ या दिवशी चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत. या लेखमालिकेतून ‘प.पू. दादांनी त्यांच्या कुटुंबावर कोणते आणि कशा प्रकारे संस्कार केले ?’, हे कळेल. त्यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कौटुंबिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी कशी होती ?’, हेही वाचकांच्या लक्षात येईल.’

२६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आपण प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांचा परिचय आणि प.पू. दादांची गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज त्यापुढील भाग पाहूया.

प्रथम भाग वाचण्यासाठी येथे क्लीक करा : https://sanatanprabhat.org/marathi/514073.html

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील पू. बाळाजी आठवले आणि आई पू. (सौ.) नलिनी आठवले

२. प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांना जीवनभर साथ देणार्‍या पत्नी पू. नलिनी (पू. ताई) आठवले यांची वैशिष्ट्ये

२ अ. ‘पू. ताईंचा जन्म आणि देहत्याग : पू. नलिनी बाळाजी आठवले, या माझ्या आई. आम्ही त्यांना ‘ताई’ म्हणायचो. त्यांचा जन्म ४ जुलै १९१६ या दिवशी झाला. ३ डिसेंबर २००३ या दिवशी वयाच्या ८७ व्या वर्षी आमच्या शीव, मुंबई येथील घरी त्यांनी देहत्याग केला. देहत्यागाच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ७५ टक्के होती.

२ आ. साधना

२ आ १. पू. ताईंनी संसारात राहून साधना केली. घरातील सगळ्या व्यापांतून पू. ताई कीर्तन-प्रवचन ऐकण्यासाठी वेळ काढत असत. वयाच्या ६० वर्षांनंतर त्यांचा अधिकाधिक वेळ नामजप चालू असे. ७० वर्षांनंतर त्यांचा अखंड नामजप चालू असे. मृत्यूच्या क्षणीही त्यांचा नामजप चालू होता. वर्ष २०१४ या वर्षी त्यांची आध्यात्मिक पातळी ७५ टक्के होती.

२ आ २. ‘ती. दादांनी देहत्याग केल्यानंतर पू. ताईंनी नामजप वाढवला. हळूहळू त्यांचे वैराग्य वाढले अन् देहबुद्धी न्यून झाली.’ – (सद्गुरु) डॉ. वसंत आठवले (ज्येष्ठ पुत्र)

२ इ. ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून समर्पित मुले सिद्ध होतील’, याची पू. ताईंना निश्चिती होणे : ऑक्टोबर २००० मध्ये पू. ताई म्हणाल्या, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे, ‘देशासाठी प्रत्येक कुटुंबाने एक मुलगा अर्पण करावा.’ ‘माझी पाचही मुले हडकुळी असल्याने ती देशासाठी कशी अर्पण करायची ?’, असा मला प्रश्न पडायचा. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून माझा तो प्रश्न मिटला. ‘आता घरोघरी समर्पित मुले सिद्ध (तयार) होतील’, याची मला निश्चिती झाली आहे.’’ तेव्हा पू. ताईंनी पुढील ओळ लिहिली आणि ‘दोन मुले देशासाठी कशी अर्पण करायची ?’, याविषयी लिहिले,

देव-देशधर्म जागवोत दोघे (टीप) ।
इच्छा ही मानसी असो त्यांच्या ।।

टीप : ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले आणि एक भाऊ

२ ई. वाईट शक्तींच्या संदर्भात पू. ताईंच्या अनुभूती आणि त्यांचे विचार

२ ई १. राष्ट्र आणि धर्म यांसाठी वाईट शक्तींना नामजप करण्यास सांगणे : ‘एके दिवशी पू. ताई झोपलेल्या असतांना अनेक वाईट शक्ती त्यांच्या खोलीच्या बाहेरील सज्जात (गॅलरीत) आल्या होत्या. तेव्हा पू. ताई त्यांना म्हणाल्या, ‘तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी काहीतरी करा. स्वतःचा उपयोग धर्मासाठी करा.’ तेव्हा सर्व वाईट शक्ती ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करू लागल्या.’ – डॉ. विलास आठवले (सर्वांत धाकटे पुत्र)

२ ई २. सनातनला त्रास देणार्‍या वाईट शक्तींचाही चांगल्या कामासाठी उपयोग करून घ्या ! : ‘मी पू. ताईंकडे भेटायला गेले असतांना पू. ताई म्हणाल्या की, ‘सनातनला जी भुते त्रास द्यायला येतात, त्यांना तुम्ही घालवू नका. त्यांचा उपयोग करून घ्या. त्यांना सूक्ष्मातून लढण्यासाठी पाठवा. त्यांचाही चांगल्या कामासाठी उपयोग करून घेता आला पाहिजे.’

– सौ. बोरकर, मुंबई

(सात्त्विक ठिकाणी साधना करू इच्छिणार्‍या शक्ती येतात. त्यांना जप करण्यास सांगितल्यास त्या जप करतात. कधी मायावी वाईट शक्तीही जप केल्याचे नाटक करतात. – संकलक)

२ उ. ८७ व्या वर्षीही समाजाचा आणि दुसर्‍याचा विचार करणार्‍या पू. ताई !

वयाची ८७ वर्षे झाली असतांना आणि स्वतः आजारी असतांना पू. ताई पुढील गोष्टी करत होत्या. त्या देहत्यागापर्यंत समाजाचा आणि दुसर्‍याचा विचार करत होत्या अन् स्वत:च्या अंगी असलेल्या गुणांचा शीव येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रासाठी आणि साधकांसाठी लाभ व्हावा, यासाठी प्रयत्न करत होत्या.

१. ‘पू. ताई नियमितपणे वृत्तपत्रांचे वाचन करून समाजाच्या सद्यःस्थितीची माहिती जाणून घेत होत्या. त्याचप्रमाणे त्या समाजाच्या दुरवस्थेविषयी साधकांशी चर्चा करत असत.’ – डॉ. दुर्गेश सामंत, माजी समूह संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह.

२. ‘कोणतीही वस्तू वापरतांना ती काटकसरीने वापरण्यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असे. सेवाकेंद्रातील घडामोडींवर, तसेच वीज आणि पाणी यांच्या अनावश्यक वापरावर त्यांचे नेहमी लक्ष असे.’ – सद्गुरु सत्यवान कदम

३. सनातनच्या साधकांमध्ये वीरवृत्ती निर्माण करण्यासाठी त्या सतत प्रयत्न करत असत.

४. ‘गेल्या चार वर्षांपासून पू. ताईंना हृदयविकाराचा पुष्कळ त्रास होत होता; पण त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या संदर्भात काही न बोलता त्या दुसर्‍यांची विचारपूस करायच्या. ‘प्रत्येकाने आपापली कामे करावी. माझ्यासाठी वेळ घालवायला नको’, असे त्या नेहमी सांगायच्या. कधीही स्वतःला काही कमी पडले; म्हणून त्यांनी तक्रार केली नाही. त्यांच्यात पुष्कळ सहनशक्ती होती. दुसर्‍याविषयी वाईट बोलणे वा त्याचे दुर्गुण दाखवणे, असे त्यांनी कधीही केले नाही. उलट त्या प्रत्येकाविषयी चांगलेच सांगायच्या. सर्वांशी त्या पुष्कळ प्रेमाने वागायच्या.’ – सद्गुरु डॉ. वसंत आठवले

२ ऊ. मृत्यूच्या वेळीही नामजप चालू असणे

‘मी : जप चालू आहे ?

पू. ताई : हो.’

– डॉ. विलास आठवले

३.१२.२००३ या दिवशी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी हृदयक्रिया बंद पडून ताईचे देहावसान झाले. मृत्यूसमयी तिचे वय ८७ वर्षे होते.’ (खंड २)

३. पाचही मुलांची साधनेत प्रगती होण्यासाठी त्यांच्यावर लहानपणापासूनच संस्कार करणारे प.पू. दादा आणि पू. ताई !

‘प.पू. दादा (आध्यात्मिक पातळी ८३ टक्के) आणि पू. ताई (आई) (आध्यात्मिक पातळी ७५ टक्के) यांनी लहानपणापासून आम्हा पाचही भावंडांवर व्यावहारिक शिक्षणाच्या समवेत सात्त्विकता आणि साधना यांचे संस्कार केल्यामुळे आम्ही साधनारत झालो. त्यांनी नातवंडांवरही असेच संस्कार केले. प.पू. भक्तराज महाराज यांनी अनंत (भाऊ) सोडून सर्व कुटुंबाला गुरुमंत्र दिला. अनंत मुंबईत नसल्यामुळे त्यांना गुरुमंत्र मिळाला नाही.

१. एक क्रमांकाचा मुलगा सद्गुरु अप्पा (सद्गुरु डॉ. वसंत) : हे वर्ष २०१२ मध्ये संतपदाला पोचले आणि वर्ष २०१७ मध्ये सद्गुरुपदाला पोचले. त्यांनी पालकांसाठी उपयुक्त ग्रंथ १०, आयुर्वेदविषयक २१ आणि माझ्यासंदर्भात १ असे ३२ ग्रंथ लिहिले आहेत.

२. दोन क्रमांकाचा मुलगा अनंत (भाऊ) : हे वर्ष २०१९ मध्ये संतपदाला पोचले. यांनी ‘गीताज्ञानदर्शन’ हा ग्रंथ वर्ष २०१४ मध्ये लिहिला. वर्ष २०२१ मध्ये त्यांनी ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हा ग्रंथ लिहिला आहे. तसेच त्यांचे चरित्रही लवकरच प्रकाशित केले जाणार आहे.

३. तीन क्रमांकाचा मुलगा जयंत : मी सनातन संस्थेची स्थापना केली आणि सप्टेंबर २०२१ पर्यंत २६९ ग्रंथांचे संकलन केले, तर संस्थेने सप्टेंबर २०२१ पर्यंत ३४७ ग्रंथांच्या १७ भाषांत ८२ लाख ४८ सहस्र प्रती प्रकाशित केल्या आहेत.

४. चार क्रमांकाचा मुलगा कै. सुहास : यांची पातळी ६४ टक्के आहे. यांची व्यष्टी साधना होती. सुहास सज्जनतेची सगुण मूर्ती होते.

५. पाच क्रमांकाचा मुलगा विलास : यांचीही आध्यात्मिक प्रगती होत आहे. हे हरिद्वार येथील प.पू. देवानंद स्वामी यांच्या कार्यात सहभागी असतात.

कलियुगात आम्हाला असे सात्त्विक कुटुंब मिळाले, हीच ईश्वराने आम्हा सर्वांवर केलेली मोठी कृपा आहे. यामुळेच १२.६.१९७५ या दिवशी मी मामाला इंग्लंडहून लिहिलेल्या पत्रात लिहिले होते, ‘मला आपल्या सर्व नातेवाइकांसह (विशेषतः ती. दादा, ती. सौ. ताई आणि ती. अप्पा यांच्या संगतीसाठी) आणि ओळखीच्या माणसांसह एकच नाही, तर आणखी कितीही जन्म लाभले, तरी आनंदच वाटेल. तसेच प्रत्येक जन्मात झालेल्या चुका सुधारण्याची संधी पुनर्जन्मात मिळत असते. तिचा लाभ घेऊन मुक्तीच्या दिशेने प्रयत्न करता येतो.’

माझ्यात जे गुण आहेत, ते मी प्रयत्नपूर्वक निर्माण केलेले नसून बहुतेक गुण दादा आणि ताई यांच्याकडून अनुवंशिकतेने अन् त्यांनी माझ्यावर केलेल्या संस्कारांमुळे माझ्यात आले आहेत. इतर बहुतेक गुण बर्‍याच प्रमाणात चारही भावांकडून आणि उरलेले आदर्श व्यक्तींकडून माझ्यात आले आहेत.’

[प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले, त्यांच्या पत्नी पू. नलिनी (पू. ताई) आठवले आणि कुटुंबीय यांची सविस्तर माहिती सनातनच्या ‘प.पू. डॉक्टरांचे सर्वांगांनी आदर्श आई-वडील आणि भाऊ’ या विषयाच्या ग्रंथमालिकेत आहे.] (क्रमशः)

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१२.९.२०१४) (खंड २)

‘या लेखमालिकेतील सर्व लिखाण सनातनच्या ‘सुगम अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतून संक्षिप्त स्वरूपात घेतले आहे. लेखातील एखादे सूत्र वाचकांना सविस्तर वाचावयाचे असल्यास ‘ते कोणत्या ग्रंथातून घेतले आहे ?’, हे कळण्यासाठी प्रत्येक सूत्राच्या शेवटी कंसात त्याचा खंड क्रमांक दिला आहे.

‘सुगम अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांमध्ये ‘दैवी गुणसंपन्नता आणि आध्यात्मिदृष्ट्या उन्नत अशा कुटुंबाला जन्म देणार्‍या वडिलांनी कोणती शिकवण दिली असेल ?’, याची माहिती मिळते. यातून वाचकांना ‘आदर्श आई-वडील कसे व्हायचे ? आई-वडील म्हणून साधनेची विविध अंगे कोणती ?’, हेही कळेल. असे मौलिक ज्ञान असणार्‍या ग्रंथांचे केवळ वाचन नव्हे, तर त्यातील सूत्रे आत्मसात करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यांचे कुटुंबही सात्त्विक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (११.९.२०२१)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक