कुटुंबियांचीही साधनेत अद्वितीय प्रगती करवून घेणारे एकमेवाद्वितीय प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले ! (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील)

सर्वच वाचकांना स्वतःच्या पाल्यांवर संस्कार कसे करावेत ? हे कळण्यासाठी उपयुक्त असलेली लेखमालिका !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’मध्ये संतांचा साधनाप्रवास, त्यांची शिकवण यांच्या संदर्भातील लेख नियमित प्रकाशित केले जातात. १९ सप्टेंबरला चालू झालेल्या या लेखमालिकेतून ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी (प.पू. दादा) आठवले यांच्या संदर्भात लेख प्रकाशित करत आहोत. या लेखमालिकेतून ‘प.पू. दादांनी त्यांच्या कुटुंबावर कोणते आणि कशा प्रकारे संस्कार केले ?’, हे कळेल. त्यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कौटुंबिक आणि आध्यात्मिक पार्श्वभूमी कशी होती ?’, हेही वाचकांच्या लक्षात येईल.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वडील प.पू. बाळाजी आठवले आणि आई पू. (सौ.) नलिनी आठवले

१. प.पू. बाळाजी (प.पू. दादा) वासुदेव आठवले यांचा परिचय

१ अ. प.पू. दादा यांचा जन्म आणि देहत्याग : ‘प.पू. बाळाजी (उपाख्य श्रीकृष्ण) वासुदेव आठवले, हे माझे वडील. त्यांना आम्ही ‘दादा’ म्हणायचो. यांचा जन्म ९.९.१९०५ या दिवशी नाशिक येथे झाला. त्यांनी २८.१.१९९५ या दिवशी आमच्या शीव, मुंबई येथील घरी देहत्याग केला. देहत्यागाच्या वेळी त्यांची आध्यात्मिक पातळी ८३ टक्के होती. त्यांची काही वैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१ आ. प.पू. दादांची गुणवैशिष्ट्ये (खंड १)

१ आ १. आदर्श आई-वडील : दादा आणि ताई (आईला आम्ही ‘ताई’ म्हणायचो.) यांनी लहानपणापासून आम्हा पाचही मुलांवर व्यावहारिक शिक्षणाच्या समवेत सात्त्विकता आणि साधना यांचे संस्कार केले. त्यामुळे आम्ही साधनारत झालो. आई-वडिलांचे भांडण झाल्याचे आम्ही पाचही भावंडांनी आयुष्यात एकदाही पाहिले नाही. एवढेच नव्हे, तर आम्हा पाच भावंडांचेही एकमेकांशी कधीच भांडण झालेले नाही. आमचे एकमेकांवर प्रेमच होते आणि ते अजूनही आहे. आम्हा सर्वांवर दादा आणि ताई यांनी केलेल्या संस्कारांमुळेच हे शक्य झाले.

१ आ २. आदर्श शिक्षक : दादा शाळेत शिक्षक होते. त्यांना विद्यार्थ्यांच्या वह्या पडताळाव्या लागत. विद्यार्थ्यांचे लिखाण थोडक्यात आणि व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण असण्यासाठी ते त्यांना शिकवायचे. त्यांचे स्वतःचेही लिखाण तसेच असायचे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगले शिकवता यावे; म्हणून दादा निरनिराळी पुस्तके वाचून आणि स्वतः चिंतन करून गणित, इंग्रजी इत्यादी सर्वच विषयांची टाचणे बनवत. त्यांना विषय सोपा करून विद्यार्थ्यांना शिकवण्याची सवय होती. ते वर्ष १९६६ मध्ये वयाच्या ६० व्या वर्षी शाळेतून सेवानिवृत्त झाले.

१ आ ३. सेवानिवृत्तीनंतरची ३० वर्षे आणि शेवटच्या आजारपणातही लिखाण अन् वाचन चालूच असणे : १९९५ या वर्षी देहत्याग करीपर्यंत, म्हणजे १९६६ ते १९९५ या ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी बरेच लिखाण केले. जीवनातील शेवटची ५ वर्षे ते अंथरुणाला खिळून होते, तरी त्यांचे अध्यात्मशास्त्रावरील लिखाण चालू असे. उरलेल्या वेळेत त्यांचे वाचन आणि नामजप चालू असे. (खंड १)

१ आ ४. प.पू. दादांनी नामजप करण्यापेक्षा डॉ. आठवले आणि पू. अप्पा (डॉ. आठवले यांचे सर्वांत मोठे बंधू) यांचे लिखाण पडताळण्यास प्राधान्य देणे : दादांचा नामजप अखंड चालू असे. प्रतिदिन त्यांचा १० घंटे तरी नामजप होत असे. साधना महत्त्वाची असली, तरी ते माझे आणि अप्पांचे लिखाण पडताळायला किंवा त्याचे भाषांतर करायला आम्ही दिले, तर नामजप न करता आमचे लिखाण पडताळण्यास प्राधान्य देत. (खंड १)

१ आ ५. स्वतःला त्रास होत असतांनाही लिखाण पडताळून देणे आणि त्याचे भाषांतरही तत्परतेने करणे

१ इ. प.पू. भक्तराज महाराज मला म्हणायचेही, ‘तुमचे वडील संतच आहेत !’ : दादा संतच असल्यामुळे प.पू. भक्तराज महाराज दादांना त्यांच्या बाजूला पलंगावर बसवायचे, म्हणजे मी ते संत असल्याचे ओळखण्याच्या २६ वर्षे आधीच प.पू. भक्तराज महाराज यांनी दादा संत असल्याचे सांगितले होते. (खंड १)

१ ई. प.पू. दादांची आध्यात्मिक पातळी आणि अहंभाव

१ उ. प.पू. दादा बसत असलेली लादी गुळगुळीत होणे : ‘अप्पा आणि डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या लिखाणाच्या भाषांतरासाठी दादा जेथे बसत असत, तेथील लादी गुळगुळीत झाली आहे.’ – डॉ. विलास आठवले (प.पू. दादांचे सर्वांत धाकटे पुत्र), मुंबई (१०.३.२०१४) (खंड १)

‘या लेखमालिकेतील सर्व लिखाण सनातन-निर्मित ‘सुगम अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतून संक्षिप्त स्वरूपात घेतले आहे. लेखातील एखादे सूत्र वाचकांना सविस्तर वाचावयाचे असल्यास ‘ते कोणत्या ग्रंथातून घेतले आहे ?’, हे कळण्यासाठी प्रत्येक सूत्राच्या शेवटी कंसात त्याचा खंड क्रमांक दिला आहे.

‘सुगम अध्यात्मशास्त्र’ या ग्रंथमालिकेतील ग्रंथांमध्ये ‘दैवी गुणसंपन्नता आणि आध्यात्मिदृष्ट्या उन्नत अशा कुटुंबाला जन्म देणार्‍या वडिलांनी कोणती शिकवण दिली असेल ?’, याची माहिती मिळते. यातून वाचकांना ‘आदर्श आई-वडील कसे व्हायचे ? आई-वडील म्हणून साधनेची विविध अंगे कोणती ?’, हेही कळेल. असे मौलिक ज्ञान असणार्‍या ग्रंथांचे केवळ वाचन नव्हे, तर त्यातील सूत्रे आत्मसात करून त्याप्रमाणे कृती केल्यास त्यांचे कुटुंबही सात्त्विक होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (११.९.२०२१)

सूक्ष्मातील प्रयोग

प.पू. दादा यांच्या छायाचित्राकडे पाहून मनाला काय जाणवते, याचा अभ्यास करा !

प.पू. बाळाजी आठवले

‘वरील लेखात प.पू. दादांची बुद्धीगम्य माहिती दिली आहे. येथे प.पू. दादांचे छायाचित्र १ छापले आहे. त्याच्याकडे पाहून ‘मनाला काय जाणवते ?’, याचा जिज्ञासूंनी अभ्यास करावा.

हे छायाचित्र पाहून सनातनच्या साधकांना जाणवलेली वैशिष्ट्ये येथे दिली आहेत. ती वाचल्यावर ‘जिज्ञासूंना आणि सनातनच्या साधकांना काय जाणवले ?’, याची तुलना करता येईल. असे जाणवण्याला ‘बुद्धीअगम्य माहिती’ म्हणतात. साधनेने जेवढी प्रगती होते, तेवढे जाणवणे अचूक होत जाते. या जाणवण्याची भाषा प्रत्येकाच्या साधनामार्गानुसार निराळी असते.’ (खंड ३)

१. सनातनच्या साधकांना प.पू. दादांच्या छायाचित्राची जाणवलेली वैशिष्ट्ये : ‘प.पू. दादांच्या छायाचित्राकडे पाहून भाव जागृत झाला. ‘त्यांचे डोळे करुणाभावाने ओथंबलेले आहेत’, असे मला जाणवले; म्हणून सनातनच्या रामनाथी (गोवा) आणि देवद (पनवेल) आश्रमांतील साधकांकडून ‘त्या छायाचित्राकडे पाहून काय जाणवते ?’, असा प्रयोग करून घेण्यात आला. तेव्हा साधकांना ते कुणाचे छायाचित्र आहे, हे ठाऊक नव्हते. छायाचित्र पाहून साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत. त्यावरून ‘बर्‍याच साधकांना चांगले परीक्षण करता येते’, हे लक्षात येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले (१०.४.२०१३)

१ अ. मनोदेहाला आलेल्या अनुभूती (नामजप चालू होणे) : ‘छायाचित्र हातात घेतल्यावर माझा नामजप एका लयीत चालू झाला.’ – कु. दीपाली मतकर, सौ. पाध्ये आणि श्रीमती सुनीता चितळे

१ आ. सूक्ष्म-ज्ञानेंद्रियांना आलेल्या अनुभूती

१. पृथ्वीतत्त्वाची अनुभूती (सुगंध येणे) : ‘छायाचित्र हातांत घेतल्यावर अष्टगंधाचा सुगंध आला आणि छायाचित्र हातांत असेपर्यंत तो येत होता. असे दोन वेळा झाले.’ – श्री. धैवत वाघमारे

२. तेजतत्त्वाची अनुभूती (छायाचित्र सजीव वाटणे) : ‘छायाचित्राकडे पाहिल्यावर त्यात जिवंतपणा जाणवला.’ – सौ. मानसी सहस्रबुद्धे, श्री. आनंद जाखोटिया आणि श्री. भरत मिरजे

३. वायुतत्त्वाची अनुभूती (थंडावा जाणवणे) : ‘छायाचित्र हातात घेतल्यावर देहात पुष्कळ थंड वाटले आणि हातही थंड झाले.’ – कु. दीपाली मतकर

१ इ. जीवात्म्याला आलेल्या अनुभूती : ‘छायाचित्र पाहून लगेच भावजागृती झाली.’ – श्री. आनंद जाखोटिया आणि कु. प्रियांका लोटलीकर

१ ई. चैतन्य जाणवणे

१. छायाचित्रामधून प्रक्षेपित होणारे चैतन्य श्वासावाटे आत घेत असल्याचे जाणवून त्यामुळे आनंददायी आणि शांत वाटणे : ‘छायाचित्रामधून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे प्रत्येक वेळी श्वास घेत असतांना ‘मी चैतन्य आत घेत आहे’, असे जाणवत होते. ही अनुभूती केवळ शुद्ध हवा आत घेण्यापेक्षा श्रेष्ठ असून त्यामुळे मला आनंददायी आणि शांत वाटत होते.’ – कु. क्रिस्टी ल्युंग (आताच्या सौ. राधा मल्लिक), व्हॅन्कुवर, कॅनडा.

२. ‘छायाचित्र पहातांना ‘ते परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्याशी साम्य दर्शवणारे आहे’, असे मला जाणवले.’ – कु. ज्योंजवेर, हंगेरी, युरोप.

१ उ. शांती जाणवणे

१. ‘छायाचित्राकडे पाहून शांती जाणवली.’ – कु. सायली गाडगीळ (आताच्या सौ. सायली करंदीकर)

२. ‘छायाचित्र पाहिल्यावरच मन निर्विचार झाले. छायाचित्र हातांत घेतल्यावर मनाच्या निर्विचार अवस्थेत वाढ होऊन ते शांत झाले. त्यानंतर मनाची शांत अवस्था ३० मिनिटे टिकून होती.’ – अधिवक्ता योगेश जलतारे

१ ऊ. छायाचित्रातील व्यक्तीच्या डोळ्यांकडे पाहून आलेल्या अनुभूती

१. ‘त्यांच्या डोळ्यांत वात्सल्यभाव जाणवला. ‘छायाचित्रातील व्यक्ती माझ्याकडे पाहून बोलत आहे’, असे जाणवले.’ – सौ. आरती म्हैसकर

२. प्रीती जाणवणे

अ. ‘छायाचित्रातील व्यक्तीच्या डोळ्यांमधून प्रीतीच्या धारा निघत असल्याचे जाणवले. छायाचित्राकडे पहिल्यांदाच पाहिले, तरी ‘त्यांच्याशी पुष्कळ जवळीक आहे’, असे वाटत होते.’ – कु. तृप्ती गावडे

आ. ‘छायाचित्राकडे पहात असतांना त्यांच्यात पुष्कळ प्रीती असून ‘ते मला प्रेमाने घट्ट मिठी मारत आहेत’, असे मला वाटले. तसेच ‘मी त्यांच्या प्रेमाने व्यापलो आहे’, असे जाणवले.’ – (सद्गुरु) सिरियाक वाले

इ. छायाचित्रातील व्यक्तीच्या साधनेचा प्रवास ‘ज्ञानोत्तर भक्ती’, असा असून डोळे शरणागतभावाने प्रार्थना करत असल्याचे जाणवणे : ‘छायाचित्रातील व्यक्तीच्या साधनेचा प्रवास ‘ज्ञानोत्तर भक्ती’ असा असावा’, असे वाटले. या व्यक्तीचे लक्ष संसारात राहूनही देवाकडे आहे, म्हणजे संसारात असूनही नसल्यासारखीच स्थिती असावी. ‘या व्यक्तीचे डोळे शरणागतभावाने देवाकडे प्रार्थना करत आहेत’, असे वाटले.’

– श्री. विनायक आगवेकर

ई. छायाचित्रातील व्यक्तीचे नेत्र सजीव जाणवणे : ‘छायाचित्रातील व्यक्तीमध्ये समष्टीच्या कल्याणाची प्रबळ धारणा असल्याने तिचे नेत्र ‘समष्टीचे कार्य आणि हिंदु राष्ट्र लवकरात लवकर स्थापन व्हावे’, यांसाठीची उत्कटता दर्शवणारे आहेत. त्यामुळे ते सजीव जाणवत आहेत.’ – कु. नीता अहिरे

१ ए. संतत्वाची प्रचीती येणे

१. ‘हे कुणीतरी संत आहेत’, असे जाणवले.’ – कु. सायली गाडगीळ (आताच्या सौ. सायली करंदीकर), कु. अर्चना मुळीक, कु. तृप्ती गावडे आणि एक साधिका

२. ‘छायाचित्राकडे पाहून ते संत असून त्यांची आध्यात्मिक पातळी ७५ टक्क्यांहून अधिक असल्याचे जाणवले.’ – कु. प्रियांका लोटलीकर [‘प्रत्यक्षात त्यांची पातळी ८१ टक्के आहे.’ – डॉ. आठवले (१०.४.२०१३)]

३. ऋषीतुल्य व्यक्ती वाटणे : ‘ही व्यक्ती ऋषीतुल्य, प्रेमळ, ज्ञानमार्गी आणि भक्तीमार्गी वाटली.’ – श्री. प्रकाश मराठे

१ ऐ. व्यक्तीची निर्गुणाकडे आणि मोक्षाकडे वाटचाल होत असल्याचे जाणवणे

१. ‘ती व्यक्ती भावावस्थेत असून ती शून्याकडे वाटचाल करत आहे’, असे जाणवले.’ – श्री. सौरभ सप्रे

२. ‘त्या व्यक्तीचा प्रवास वेगाने निर्गुणाकडे होत असल्याचे जाणवले.’ – श्री. दादासाहेब घाडगे, कु. भक्ती पारकर (आताच्या सौ. भक्ती महाजन), कु. सुदेष्णा पिंपळे, श्री. विकास भगत आणि श्री. भरत मिरजे (खंड ३) (क्रमशः)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक