मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) येथील नगरपरिषदेचा ठराव
विशाळगडच्या रक्षणासाठी ठराव संमत करणार्या मलकापूर नगरपरिषदेचे अभिनंदन ! – संपादक
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर), २ ऑक्टोबर (वार्ता.) – विशाळगडाच्या रक्षणासाठी कार्यरत ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’ कार्यरत असून त्याला मलकापूर नगरपरिषद पाठिंबा देत आहे. विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावीत, या परिसरात पन्हाळा ते विशाळगड रणसंग्रामाचे ऐतिहासिक भव्य स्मारक उभारावे. गडाची ग्रामदेवता असणार्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि त्यांचा जीर्णाेद्धार करावा, तसेच गड अन् तटबंदी यांची दुरुस्ती करावी, या मागण्यांचा ठराव मलकापूर नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत संमत केला. यासाठी नगराध्यक्ष श्री. अमोल केसरकर, उपनराध्यक्ष भारत गांधी आणि विरोधी पक्षनेते श्री. बाबासाहेब पाटील यांनी पुढाकार घेतला.
गेल्या मासात ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधी कृती समिती’ने नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष श्री. भारत गांधी, नगराध्यक्ष श्री. अमोल केसरकर आणि विरोधी पक्षनेते श्री. बाबासाहेब पाटील यांची भेट घेऊन त्यांना याविषयी अवगत केले होते. त्या वेळी त्यांनी ‘या संदर्भात आम्ही ठराव मांडू’ असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सहकारी यांनी विशेष प्रयत्न करून हा ठराव संमत केला. या ठरावावर सूचक म्हणून श्री. भारत गांधी, तर अनुमोदक म्हणून माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक श्री. प्रवीण प्रभावळकर यांची स्वाक्षरी आहे.
मलकापूर नगरपरिषदेने संमत केलेला ठराव !
‘श्रीशिवछत्रपतींचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड आज राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. गडावर विविध ठिकाणी अतिक्रमणे झाली असून तेथील मंदिरांची पडझड झाली आहे. स्वराज्यासाठी बलीदान देणारे वीर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीस्थळाकडे पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे. यासाठी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ कार्य करत आहे. त्यांना पाठिंबा देत पन्हाळा ते विशाळगड रणसंग्रामाचे परिसरात ऐतिहासिक भव्य स्मारक करावे, गडाची ग्रामदेवता असणार्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जिर्णाेद्धार करावा, तसेच गड आणि तटबंदी यांची डागडुजी करावी, अशा मागण्या ही सभा करत आहे.’