गडचिरोली येथील भाजपच्या नगरसेवकांच्या तक्रारीनंतर नगराध्यक्षा योगिता पिपरे अपात्र म्हणून घोषित !

  • नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी पदाचा अपवापर करून नियमबाह्य कामे केल्याचे प्रकरण

  • ६ वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यास मनाई !

नगराध्यक्षा योगिता पिपरे यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे ! – संपादक

गडचिरोली – येथील भाजपच्या नेत्या आणि नगरपालिकेच्या नगराध्यक्षा योगिता प्रमोद पिपरे यांनी स्वतःच्या पदाचा अपवापर करून नियमबाह्य कामे केल्याच्या प्रकरणी त्यांना नगरविकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले आहे. तसेच त्यांना ६ वर्षांपर्यंत निवडणूक लढण्यासही बंदी घातली आहे. डिसेंबर २०१६ मध्ये येथील नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या योगिता पिपरे थेट जनतेतून निवडून येऊन नगराध्यक्ष झाल्या होत्या. ‘पिपरे यांनी स्वतःच्या पदाचा अपवापर करून अनधिकृतरित्या अनेक ठराव संमत करवून घेतले आहेत. त्यांनी भाड्याचे वाहन वापरून ११ लाख ६१ सहस्र ५१४ रुपयांची उचल केली आहे. त्यामुळे पिपरे यांना अपात्र घोषित करावे’, अशा तक्रारी भाजपच्या नगरसेवकांनी केल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन पिपरे यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव नगरविकास मंत्रालयाकडे पाठवला होता.