चीनमधील विजेच्या अभूतपूर्व टंचाईचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होणार !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोळशाच्या तुटवड्यामुळे विजेची अभूतपूर्व टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होणार असल्याचे बोलले जात आहे; कारण जागतिक बाजारपेठेत चीन हा जगातील सर्वांत मोठ्या निर्यादारांपैकी एक आहे. चीनमधील विजेच्या संकटामुळे आशियाई देशांमधील व्यापार व्यवस्था कोलमडू शकते, तर व्यापारासाठी चीनवर अवलंबून असणार्‍या देशांमध्येही याचे परिणाम दिसून येतील. अनेक कोळसा उत्पादक आस्थापनांनी यापूर्वीच कोळशाच्या घटणार्‍या साठ्यांच्या संदर्भात चिनी सरकारला सूचना केल्या होत्या.

१. चीनमध्ये विजेच्या अभावी अनेक आस्थापने बंद ठेवण्यात आली आहेत. चीनमधील अनेक महत्त्वाच्या पथदिवे, तसेच वाहतुकीचे नियमन करणारे ‘सिग्नल’ बंद आहेत. विजेच्या टंचाईमुळे पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि पाणी पुरवठा करणारी यंत्रणाही बंद पडली आहे. यामुळे कोट्यवधी नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. उद्वाहने (लिफ्ट) बंद झाल्यामुळे उंच इमारतींमध्ये रहाणार्‍यांचे हाल होत आहेत. विजेच्या अभावी भ्रमणभाषचे ‘नेटवर्क’ (जाळे) कोलमडले आहे. भ्रमणभाषला ‘सिग्नल’ देणारे उंच ‘अँटिना’ विजेच्या अभावी बंद आहेत.

२. चीनमध्ये विजेच्या वापरावरील निर्बंध आणि वस्तूंची वाढती मागणी, तसेच वाढत्या किमती, यांमुळे चीनमधील उत्पादन क्षमतेत कमालीची घट झाली आहे.