ठरवून दिलेल्या जागेत व्यवसाय करण्याच्या दिल्या सूचना !
कणकवली – भाजी, फळे आणि फुले यांचा व्यवसाय करणार्यांना शहरातील पटवर्धन चौकात उड्डाणपुलाच्या खाली व्यवसाय करण्यासाठी जागा ठरवून दिल्या आहेत; मात्र काही विक्रेत्यांनी नगरपंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून रस्त्याच्या लगत पुन्हा व्यवसाय चालू केला आहे. त्यामुळे अशा नियम मोडणार्यांवर नगरपंचायतीकडून कारवाई करण्यात येईल, अशी चेतावणी नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे. (नगरपंचायत प्रशासन जनतेला त्रास होऊ नये आणि व्यावसायिकांना व्यवसाय करता यावा, यासाठी नियोजन करून देत असतांना त्याकडे दुर्लक्ष करून मनमानी करणार्यांवर कारवाई होणे योग्यच ! – संपादक)
कणकवली शहरात भाजी, फळे आणि फुले यांचा व्यवसाय करणार्यांना व्यवसाय करण्यासाठी जागेचे नियोजन करून देण्यात आले होते. श्री गणेशचतुर्थीच्या नंतरही शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये; म्हणून हेच नियोजन पुढील काळासाठी कायम ठेवण्यात आले; मात्र नंतर या नियोजनाकडे दुर्लक्ष करून किरकोळ व्यावसायिकांनी व्यवसाय चालू केला. त्यामुळे बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू लागली. त्यामुळे नगरपंचायतीने केलेल्या नियोजनाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत होते. नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे आणि मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी नगरपंचायत कर्मचार्यांना याविषयी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार
३० सप्टेंबरला नगरपंचायत प्रशासनाने शहरातील रस्त्याच्या लगत व्यवसाय करणार्यांना हटवले अन् त्यांना नेमून दिलेल्या जागेच्या ठिकाणी व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील डीपी रोड आणि पटवर्धन चौक, बांधकाम कार्यालयाच्या समोरील जागा, तसेच शहरातील अन्य ठिकाणच्या विक्रेत्यांनाही या सूचना देण्यात आल्या. मुख्याधिकारी तावडे यांनी कारवाईचा प्रत्यक्ष आढावाही घेतला.