चाळीसगाव (जळगाव) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण !

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने खासदार-आमदार यांच्यासह ५ सहस्र जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश लागू असतांना चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून खासदार-आमदार यांच्यासह ५ सहस्र जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (जुलैच्या पहिल्या आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद परिसरात मध्यरात्री कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करत सहस्रोच्या संख्येने जमाव जमला होता. तेथे मूग गिळून गप्प बसणारे पोलीस छत्रपतींच्या कार्यक्रमाला मात्र गर्दी जमल्यावर लगेचच कारवाईस सिद्ध होतात, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

चाळीसगाव शहरात २६ सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन झाले. यानिमित्त ‘२०० हून अधिक जनसमुदाय एकत्र येणार नाही’, अशी अट स्थानिक प्रशासनाने घालून अनुमती दिलेली होती. असे असतांनाही ४ ते ५ सहस्र नागरिक मिरवणुकीसाठी एकत्र आले. त्यामुळे मिरवणूक अनुमतीच्या अटी अन् शर्तीचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून पुतळा आगमन समितीचे सदस्य घृष्णेश्वर पाटील, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह ५ सहस्र जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.