मूळचे वरसई (जिल्हा रायगड) येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेदप्रवीण पू. वैद्य विनय नीलकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी देहत्याग केला. श्री. हरिभाऊ दिवेकर (वय ६० वर्षे) हे पू. (कै.) विनय भावेकाका यांचे बालमित्र आहेत. श्री. दिवेकर यांना पू. भावेकाकांचा दीर्घकाळ सहवास लाभला. पू. भावेकाकांच्या देहत्यागापूर्वी अखेरचे काही मास ते सतत त्यांच्या समवेत होते. पू. काकांच्या देहत्यागापूर्वी त्यांना रुग्णालयात नेतांनाही ते त्यांच्या समवेत होते. पू. भावेकाकांनी देहत्याग केल्यानंतर त्यांच्या पार्थिवाला अग्नी देण्याचे भाग्यही श्री. हरिभाऊ दिवेकर यांना लाभले. या दीर्घ सहवासात श्री. हरिभाऊ दिवेकर यांना लक्षात आलेली पू. काकांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. गरजवंताला सर्वतोपरी साहाय्य करणे
‘पू. काकांना निर्धनांची दया येत असे. ‘गरजवंताला साहाय्य करणे’ हा त्यांचा प्रथमपासून स्वभाव होता. त्यांनी अनेक जणांना साहाय्य केले आहे. त्यांच्याकडे आलेली व्यक्ती कधी रिक्त हस्ते गेली नाही. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आणि अन्य सर्व प्रकारचे साहाय्य केले आहे. त्यांनी काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वतःच्या घरी ठेवून घेतले होते.
२. अन्यायाविरुद्ध लढा देणे आणि लढा देणार्याला प्रोत्साहन देणे
पू. भावेकाकांना निर्धन लोकांवर होणार्या अन्यायाविषयी प्रचंड चीड होती. निर्धन लोकांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात ते स्वतः लढत आणि ते अशा प्रकारे लढणार्या अन्य व्यक्तींच्या साहाय्याला जात असत. खेडेगावातील पाणीपुरवठा, शिक्षणव्यवस्था, गाव पातळीवरील प्रशासनाकडून लोकांना होणारा त्रास, या गोष्टींत पू. भावेकाका स्वतः लक्ष घालून अन्याय आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात लढत असत. ते अशा प्रकारे लढा देणार्या प्रत्येकाला प्रोत्साहनही देऊन शक्य ते सर्व साहाय्यही करत असत.
३. इतरांची साधना होण्यासाठी प्रयत्नरत
पू. भावेकाकांना ‘आमच्या कुटुंबियांनी साधना करावी आणि आमच्याकडून सेवा व्हावी’, अशी तळमळ असायची. प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमांतील उत्सवांमध्ये सेवा करण्यासाठी पू. भावेकाका मला आणि माझ्या मोठ्या बंधूंना घेऊन जात असत. आमच्याकडून अनेक वेळा अशा प्रकारे सेवा घडल्यामुळे आणि आम्हाला संत सहवास लाभल्यामुळे आमचे अनेक शारीरिक अन् आध्यात्मिक त्रासही नाहीसे झाले. त्यांच्यामुळेच आज आमचे संपूर्ण कुटुंब साधनारत आहे.
४. आयुर्वेदिक औषधनिर्मितीत हातखंडा असणारे पू. भावेकाका !
आयुर्वेदिक औषधनिर्मितीत पू. काकांना अवघड किंवा अशक्य असे काहीच नव्हते. प्रत्येक औषधाच्या निर्मितीविषयी ग्रंथ आणि संहिता यांतील माहितीपेक्षा त्यांना अनुभवातून प्राप्त झालेले ज्ञान अधिक होते. विविध औषधांच्या भावना, औषधी संस्कार इत्यादी विषयांच्या ग्रंथांतील संहितेत असलेल्या माहितीच्या आधारे अनेक वैद्य औषधे बनवण्याचा प्रयत्न करत असत. त्यात त्यांना यश न आल्यास ते पू. भावेकाकांकडून औषधनिर्मिती शिकून घेत.
५. आयुर्वेदिक औषधे आणि नामजपादी उपाय सांगणे
पू. भावेकाका रुग्णांना केवळ औषधे देऊन पाठवत नसत. ते रुग्णांना नामजपादी उपायही सांगत असत. एखाद्या रुग्णाला आध्यात्मिक त्रास अधिक असल्यास ते त्याला औषधांपेक्षाही नामजपादी उपायांवर भर देण्यास सांगत.
६. अफाट वाचन आणि धार्मिक ज्ञान असणे
पू. भावेकाकांचे वाचन आणि धार्मिक ज्ञान प्रचंड होते. त्यांना आयुर्वेदासह धर्म, अध्यात्म, साधना, संतांची चरित्रे, इतिहास, राजकारण आदी विषयांतील माहिती होती. पू. भावेकाका अनेक वेळा धार्मिक ग्रंथांचे वाचन करायचे, तसेच एखाद्या व्यक्तीला धार्मिक ग्रंथांच्या वाचनाची आवश्यकता असल्यास पू. भावेकाका त्यांना त्या ग्रंथाचे वाचन करायला सांगायचे.
७. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
७ अ. पू. भावेकाकांनी एखाद्या व्यक्तीची आठवण काढल्यावर त्यांची भेट होणे किंवा त्यांचा भ्रमणभाष येणे : पू. काकांची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता मी अनेक प्रसंगांत अनुभवली आहे. पू. भावेकाकांनी कुणाची आठवण काढली किंवा ते एखाद्या व्यक्तीविषयी बोलत असले, तर ती व्यक्ती काही वेळातच तेथे पोचत असे. अनेक जणांनी सांगितले, ‘‘त्यांच्या घरी बोलणे चालू असतांना पू. भावेकाकांची आठवण निघाल्यावर पू. भावेकाकांचा त्यांना भ्रमणभाष येत असे.’’
७ आ. पू. भावेकाका माजघरात बसले असतांना साधकाने स्वयंपाकघरात मंद आचेवर ठेवलेला बिडाचा तवा पू. भावेकाकांनी मोठ्या आचेवर ठेवण्यास सांगणे : एकदा पू. भावेकाकांनी मला त्यांच्यासाठी घावन करायला सांगितले होते. घावन करण्यासाठी मी शेगडीवरील मंद आचेवर बिडाचा तवा ठेवला होता. तेव्हा पू. भावेकाका माजघरात (घराच्या मध्यभागी असलेल्या खोलीत) बसले होते. ते स्वयंपाकघरात एकदाही आले नव्हते. काही वेळाने त्यांनी मला हाक मारून सांगितले, ‘‘बिडाचा तवा मंद आचेवरून काढून मोठ्या आचेवर ठेव, म्हणजे घावन लवकर होतील.’’
७ इ. पू. भावेकाकांनी देहत्यागाच्या चार दिवस आधी साधकाकडून सर्व कामांची सूची लिहून घेणे : पू. भावेकाकांनी देहत्याग करण्यापूर्वी ४ दिवस आधी दुपारच्या विश्रांतीच्या वेळी मला कागद आणि लेखणी घेऊन यायला सांगितले. त्याप्रमाणे मी त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी मला कामांची सूची विस्ताराने सांगण्यास आरंभ केला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व कामे लिहून घेतली. सगळी कामे लिहून झाल्यावर पू. भावेकाका मला म्हणाले, ‘‘विक्रम (पू. भावेकाकांचा मुलगा) आल्यावर त्याला ही कामांची सूची दे.’’ त्या वेळी जवळजवळ पाच कागद लिहून भरले होते. त्यानंतर चारच दिवसांनी पू. भावेकाकांनी देहत्याग केला. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘पू. भावेकाकांना देहत्यागाची सूचना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मला ती कामांची सूची लिहून घ्यायला सांगितली होती.’
– श्री. हरिभाऊ कृष्णा दिवेकर (वय ६० वर्षे), वरसई, तालुका पेण, जिल्हा रायगड. (६.८.२०२१)
|