सातारा, २९ सप्टेंबर (वार्ता.) – ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने २६ सप्टेंबर या दिवशी १५ वी ‘गडकोट स्वच्छता मोहीम’ किल्ले अजिंक्यतारा (जिल्हा सातारा) येथे पार पडली. या मोहिमेध्ये ‘छत्रपती शासन ग्रूप महाराष्ट्र राज्य’चे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी यांच्यासह राज्याच्या कानाकोपर्यांतून आलेले ३५ हून अधिक मावळे सहभागी झाले होते.
या वेळी प्राणजीत गवंडी म्हणाले की, किल्ले अजिंक्यतारा येथील श्री मंगळाईदेवी मंदिर परिसर, राजसदर, श्री महादेव मंदिर परिसर, श्री मारुति मंदिर परिसर, मुख्य दरवाजातील पायर्या आदी ठिकाणची स्वच्छता करण्यात आली. किल्ल्याच्या तटबंदीवर उगवलेली झाडी तोडण्यात आली. किल्ल्यावर आढळून आलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या आदी टाकून देण्यात आल्या. आतापर्यंत ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने राज्यातील शिवनेरी, विसापूर, लोहगड, कोरीगड, साल्हेर, मुल्हेर, रामशेज, पन्हाळगड, खर्डा, कुलाबा, तोरणा, राजगड, रायगड, अजिंक्यतारा आणि सज्जनगड आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. यापुढेही आम्ही शिवप्रभूंच्या प्रेरणेने या सेवेचे व्रत अखंडपणे चालूच ठेवणार आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या समाधीने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र सज्जनगड या ठिकाणीही ‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य’ यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. |