गंगाखेड (परभणी) येथील ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे देहावसान !

ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख

धुळे – प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचे जामदे (तालुका घनसावंगी, जिल्हा जालना) येथे रात्री कीर्तन चालू होते. त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी नंदुरबार येथे नेत असतांना रस्त्यातच त्यांचे निधन झाले. ‘श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताह’निमित्त २७ सप्टेंबरला त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. ते मूूळ परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आहेत.

ह.भ.प. शेख यांनी सांप्रदायिक कार्याचा प्रारंभ संभाजीनगर शहरातून केला होता. कीर्तन, भारूडे, गवळणी, रामायण कथा यांविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसंदर्भातही ते कीर्तनातून भाष्य करत.
‘मी मुसलमान धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदु धर्मातच मरीन’, असे ते कीर्तनातून सांगत. धार्मिक कट्टरपंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे कार्य निष्ठेने केले’, अशी भावना वारकरी सेवा संघ, महाराष्ट्र यांनी व्यक्त केली.

‘ते कीर्तनातून बरेचदा हिंदु समाजाला नावे ठेवत. कधी कधी हिंदु समाजाला नावे ठेवत कीर्तन समाप्त करत असत’, अशी माहिती सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे.