चिनी सैन्याकडून उत्तराखंडमध्ये ५ किलोमीटरपर्यंत घुसखोरी : पूल पाडून पसार !

भारताच्या मिळमिळीत भूमिकेमुळेच चीन वारंवार असे धाडस करतो, हे भारताला लज्जास्पद ! याचे प्रत्युत्तर म्हणून भारताला आता चीनविरुद्ध जशास तशी कृती करण्याची आवश्यकता आहे अन्यथा ‘भारत बचावात्मक भूमिका घेणारे राष्ट्र आहे’, अशी चीनची आणि जगाची धारणा होईल ! – संपादक

नवी देहली – चिनी सैनिकांनी उत्तराखंडच्या बाराहोती भागात घुसखोरी करून तेथील पूल पाडल्याचे वृत्त आहे. १०० हून अधिक चिनी सैनिक या वेळी उपस्थित होते. येथील एका अधिकार्‍याने सांगितले की, घुसखोरी करून परतत असतांना चिनी सैनिकांनी हा पूल पाडला.

१. ही घटना ३० ऑगस्टला झाल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याला याची माहिती मिळेपर्यंत चिनी सैनिक पसार झाले होते. ‘तुनतुन ला पास’ हा परिसर पार करून १०० हून अधिक चिनी सैनिक भारतीय सीमेमध्ये ५ किलोमीटरपेक्षा अधिक आत घुसले होते. हे सैनिक जवळपास ३ घंटे या भागात होते. हा सैन्य नसलेला भाग आहे. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चिनी सैनिक तेथे घुसू शकले. याविषयी स्थानिकांनी इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांना याची माहिती दिली. भारतीय सैन्य तेथे पोचेपर्यंत चिनी सैनिक नासधूस करून पसार झाले होते.

२. बाराहोती भागात याआधीही चिनी सैनिकांनी घुसखोरी केली होती. वर्ष १९५४ मध्ये चीनने भारतात पहिली घुसखोरी येथेच केली होती. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या भागावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. सप्टेंबर २०१८ मध्येही अशा प्रकारची घुसखोरी ३ वेळा करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. (यापूर्वी या भागात अशा प्रकारची घुसखोरी होऊनही तेथे सैनिक तैनात न करणे, हा आत्मघातच होय, असेच म्हणावे लागेल ! आतातरी येथे सैनिकांना तैनात केले जाणार कि नाही ?, हे जनतेला सांगितले पाहिजे ! – संपादक)