मंदिरांतील लूट कधी थांबणार ?

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचे प्राचीन दागदागिने, वस्तू आणि प्राचीन नाणी यांच्या चोरीप्रकरणी पसार असलेले तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांना तुळजापूर पोलिसांनी अटक केली. श्री तुळजाभवानीदेवीच्या खजिना लूट प्रकरणाची व्याप्ती आणि कालखंड मोठा आहे. या प्रकरणामध्ये केवळ दिलीप नाईकवाडी हे एकटेच दोषी नसून या प्रकरणाचा सूत्रधार, त्या काळात कार्यरत कनिष्ठ आणि वरिष्ठ शासकीय अधिकारी अन् प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी असणार्‍यांची संख्या अधिक असू शकते. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या सर्व भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे.

यापूर्वीही वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत कोट्यवधी रुपयांचा दानपेटी आणि २६५ एकर भूमी घोटाळ्याचा विषय समोर आला होता. याविरोधात हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने वर्ष २०१७ मध्ये घोटाळ्याचा चौकशी अहवाल गृह विभागाला सादर केला; मात्र या प्रकरणात कोण दोषी आहे आणि कुणावर कारवाई केली, ते अद्यापही उघड झालेले नाही. या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने हिंदुत्वनिष्ठांसह राज्यभर अनेक आंदोलने केली, तसेच विधान भवनात आमदारांनीही आंदोलन केले; मात्र या प्रकरणामध्ये सरकारची उदासीनता दिसून येते.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमधील विश्वस्त मंडळाशी संबंधित खटला न्यायालयात चालू असतांनाही न्यायालयाला माहिती न देता नव्या विश्वस्तांनी सूत्रे स्वीकारली, तसेच विश्वस्त मंडळात तज्ञ लोकांच्या नियुक्त्या न करता राजकीय व्यक्तींच्या नियुक्त्या केल्या. एकूणच या सर्व प्रकरणांवरून सरकारीकरण झालेल्या मंदिरांत चालू असलेली मनमानी दिसून येते. खरेतर मंदिरे भक्तांच्याच कह्यात असायला हवीत. हिंदूंनी भक्तीभावाने देवतेला अर्पण केलेले दागिने अन् पैसे यांचा वापर मंदिर आणि धर्मकार्य यांसाठीच व्हायला हवा. यामध्ये कुणी कुचराई करत असल्यास संबंधितांना त्वरित कठोर शिक्षा व्हायला हवी. यापुढे मंदिरांतील अपप्रकाराकडे हिंदूंनी सहजतेने न पहाता ‘प्रत्येक मंदिरातील अर्पण हे माझे दायित्व’, या जाणिवेने पाहिल्यास त्याचे मूल्य लक्षात येईल.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर